‘सिंध एज्युकेशनिस्ट असोसिएशन’च्या चर्चगेट येथील जयहिंद महाविद्यालयात वायफाय आणि ई-सुविधेच्या नावाखाली एक हजार रुपये बेकायदेशीररीत्या वसूल केले जात असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.
इतकेच नव्हे तर या शुल्काची भरणा न केल्यास विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क म्हणून भरलेल्या रकमेची पावती दिली जाणार नसल्याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना नाइलाजाने एक हजार रुपये भरावे लागत आहेत. काही विद्यार्थ्यांनी या प्रकाराची तक्रार ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’कडे केली. मनविसेचे चेतन पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने उच्चशिक्षण उपसंचालकांकडे लेखी तक्रार करून हा गैरप्रकार लक्षात आणून दिला.
आजच्या संगणकीय युगात इंटरनेट ही आवश्यक ती सेवा मानली जाते. महाविद्यालयांनी ती विद्यार्थ्यांना पुरविणे हे त्यांचे कर्तव्य आहे. अनेक महाविद्यालये ही सेवा विद्यार्थ्यांना मोफत पुरवीत आहेत. मात्र, वायफायच्या नावाखाली स्वतंत्रपणे शुल्कवसुली करणे चुकीची आहे. तसेच, प्रत्येक विद्यार्थ्यांकडून वसूल केली जाणारी १००० रुपये ही रक्कमही खूप जास्त आहे. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून इतकी रक्कम वसूल केली जात असेल तर ते विद्यार्थी आणि पालकांवर अन्यायकारक आहे, अशी प्रतिक्रिया मनविसेचे विभाग अध्यक्ष वैभव शिंदे यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांची लूट थांबवून ज्यांच्याकडून पैसे घेतले गेले असतील त्यांना ते परत करण्यात यावे, अशी मागणीही उपसंचालकांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, या संदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक वाडिया यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.