‘बॅचरल ऑफ मॅनेजमेंट’च्या ‘फायनान्शियल मॅनेजमेंट’ या विषयात अनपेक्षितपणे दांडी गुल झाल्याने शेकडो चिंताग्रस्त विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.
उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात काहीतरी गडबड झाल्याची विद्यार्थ्यांची भावना आहे. त्यामुळे, यात हस्तक्षेप करण्याची विनंती विद्यार्थ्यांनी परीक्षा नियंत्रकांना केली आहे. पाचव्या सत्रासाठी झालेल्या या परीक्षेला ११ हजाराच्या आसपास विद्यार्थी बसले होते. त्यापैकी साधारणपणे ५० टक्के विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याइतपतही किमान गुण मिळालेले नाहीत. काही महाविद्यालयांमध्ये तर उत्तीर्णतेचे प्रमाण ३० ते ४० टक्क्य़ांच्या आसपास आहे. आतापर्यंत या अभ्यासक्रमातील उत्तीर्णतेचे प्रमाण इतके कमी कधीच नव्हते.
माझ्या वर्गातील ६० विद्यार्थ्यांपैकी केवळ १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हाच प्रकार इतरही महाविद्यालयांमध्ये आहे, असे व्हीपीएम महाविद्यालयातील एका विद्यार्थ्यांने सांगितले. आमच्या वर्गातील सर्वोत्तम शैक्षणिक कामगिरी असलेल्या विद्यार्थ्यांच्या कपाळावरही या परीक्षेत नापासाचा शिक्का बसला आहे, अशी तक्रार एकाने केली.
‘फायनान्शिअल मॅनेजमेंट’ या विषयाच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन व्हावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या संदर्भात परीक्षा नियंत्रक पद्मा देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विद्यार्थ्यांकडून तक्रार आल्याचे मान्य केले. त्यांच्या तक्रारीत प्रथमदर्शनी तरी तथ्य असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, संबंधित विषयाच्या अधिष्ठात्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

..तर करिअरवरही परिणाम
काही विद्यार्थ्यांनी तर कुलगुरूंकडेही या प्रकाराची तक्रार केली आहे. अनेक विद्यार्थ्यांना १०च्या आत गुण मिळाल्याने ते चक्रावून गेले आहेत. या विषयाकरिता तीन वेगवेगळ्या नमुना उत्तरपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. त्यामुळे, उत्तरपत्रिका तपासणीत गडबड झाली असावी, असा अंदाज विद्यार्थी वर्तवित आहेत. या अनपेक्षित निकालामुळे करिअरवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले.