नमुना पाठ हा खऱ्या अर्थाने आदर्श पाठ व्हायला हवा. जेणेकरून हा पाठ घेणारा शिक्षक आणि त्यातून धडे घेणारा विद्यार्थी या दोघांनाही अध्यापन-अध्ययनातील ‘आनंदयात्री’ बनण्याचा आनंद मिळेल. साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील ‘राजुरी जिल्हा परिषद केंद्र शाळे’त एका शिक्षकाने घेतलेला नमुना पाठ असाच चिरस्मरणीय ठरला. सातवीच्या वि. स. खांडेकर यांच्या ‘फुलपाखरू’ या गद्यपाठावर ई-लर्निगच्या माध्यमातून घेतलेल्या नमुना पाठाची ही कहाणी..
आमच्या शाळेत जुलैमध्ये केंद्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे’च्या मार्गदर्शनाखाली झालेले हे पहिलेच केंद्र संमेलन. आमची केंद्र शाळा आहे. येथील केंद्र संमेलनाप्रमाणे उर्वरित केंद्र संमेलने होणार होती. त्यामुळे हे संमेलन इतरांना मार्गदर्शक आणि प्रेरक करण्याच्या दृष्टीने आम्ही आखणी केली. पुण्याच्या ‘शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमा’च्या कार्यशाळेत ई-लर्निगबाबत झालेले मार्गदर्शन या दृष्टीने आदर्श होते. त्याआधारे मराठी विषयाचा पाठ घेण्याचे निश्चित केले.
पूर्वतयारी – नमुना पाठामध्ये शैक्षणिक साहित्य, तंत्रज्ञान, गाभाघटक, मूल्ये, जीवनकौशल्ये, सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापन, अध्यापन पद्धती, ज्ञानरचनावाद, अध्ययन-अनुभव योजना इत्यादी महत्त्वाच्या संकल्पनांचा समावेश अपेक्षित आहे. ‘फुलपाखरू’ हा सातवीमधील वि. स. खांडेकर यांचा गद्यपाठ निवडला. त्याचे वाचन केले. या पाठाशी संबंधित संकल्पनांचा विचार केला. पाठ टाचण काढले. फुलपाखरांची आकर्षक चित्रे, सचित्र माहितीपूर्ण संदर्भ पुस्तके, खांडेकरांची साहित्यसंपदा जमा केली. व्हिडीओ प्रोजेक्टरच्या साहाय्याने पाठ घेण्याचे निश्चित केल्याने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, ग्राफिक्स, व्हिडीओ चित्रफिती यांचा कुठे कुठे समावेश करणे परिणामकारक होईल ते ठरविले. त्या दृष्टीने इंटरनेटवरून माहिती जमा केली. यू-टय़ूबवरून मिळविलेल्या व्हिडीओ चित्रफिती विशिष्ट प्लेअरमधील असल्याने त्या अन्य संगणकावर दिसण्यासाठी रूपांतरित करून घेतल्या.
प्रत्यक्ष अध्यापन – लॅपटॉप, व्हिडीओ प्रोजेक्टरच्या मदतीने १५ चौरस फुटी भव्य पडद्याचा प्रथमच वेगळ्या पद्धतीने अध्यापनात वापर होत असल्याने सातवीतील सर्व मुले उत्सुक होती. सुरुवातीस पाठ लेखकाचे फोटो, पुस्तके आणि माहिती असा परिचय करून देऊन मुलांमधील साहित्यिक अभिरूची वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला गेला.
निर्धारित पाठय़ांश स्पष्टीकरण पद्धतीने शिकविले. नवे शब्द, संकल्पना, शब्दसमूहांचा अर्थ व त्यांचा वाक्यातील उपयोग यासाठी पीपीटी आणि व्हिडीओ फितींचा उपयोग केला. जीवसृष्टीतील फुलपाखराचे थक्क करणारे वैविध्य, अद्भुत सौंदर्य आणि पुष्पसृष्टीतील भिरभिरणे हे सर्व व्हिडीओ फितीतून दाखविले. ज्याप्रमाणे कवितेची निर्मिती करताना लेखकाच्या अधिऱ्या डोळ्यांना फुलपाखरांचे जे अद्भुत सौंदर्य दिसले असावे त्याचीच अनुभूती जणू मुलांना आली.
पानाची टपरी, चहाचा गाडा, किराणा दुकान यापलीकडच्या अनुभवविश्वातील मौल्यवान दागिन्यांनी खचाखच भरलेले, बघणाऱ्याला दिपवून टाकणारे जवाहिऱ्याचे दुकान ग्रामीण भागातील मुलांना कसे कळणार? पण अध्यापनात योजलेल्या दोन चित्रांमुळे माझे हजार शब्दांचे काम झाले.
एवढे आकर्षक फुलपाखरू नक्कीच इंद्रधनुष्याची तोरणे उभारलेल्या व नवरत्नांनी घडविलेला घाट असणाऱ्या स्वर्गीय नदीच्या परिसरात जन्मलेले असावे, अशी लेखकाची कल्पना स्पष्ट करण्यासाठी फेसाळ पाणी घेऊन वाहणाऱ्या अवखळ स्फटिकशुभ्र नद्या, तिच्यावरचा घाट, इंद्रधनुष्याची रम्य शोभा, चमकदार नवरत्ने या सर्वाच्या इमेजेस पाहून मुले भान हरपून गेली. लेखकाने वर्णिलेला स्वर्गीय परिसर जणू वर्गातच अवतरला. याला जोडूनच एकात्म पद्धतीने फुलपाखराच्या जन्माच्या अनमोल, दुर्मीळ क्षणांची छोटी व्हिडीओ फीत दाखवली.
सर्कशीतला मृत्युगोल आणि त्यातील बेधडक मोटार सायकलस्वाराचा चित्तथरारक खेळ नेमकेपणाने साक्षात पुढे उभा करणारी व्हिडीओ फीत साहसाला सीमा नसते हेच स्पष्ट करणारी होती. यातून हे फुलपाखरू तितकेच साहसी होते हे अधोरेखित करता आले.
भान विसरून जाणे, हुलकावणी देणे यांसारख्या शब्दसमूहांच्या स्पष्टीकरणासाठी चित्रांमध्ये केलेले ग्राफिक्स, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन यांच्या योजनेमुळे सहज अर्थबोध झाला आणि त्यांच्या उपाययोजनातून मुलांच्या सर्जनशील अभिव्यक्तीला वावही मिळाला. ज्ञानाची निर्मिती मुलांनीच केली, त्याचे उपयोजन केले. यापेक्षा ज्ञानरचनावाद वेगळा तो काय?
शेवटी ‘छान किती दिसते फुलपाखरू’ या कवितेची व्हिडीओ फीत मुलांना उत्कट उत्साहाच्या उत्तुंग सीमेवर घेऊन गेली. पाठाचा शेवट झाला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. लेखकास फुलपाखराने हुलकावण्या दिल्या असल्या तरी मुलांच्या मनात मात्र त्याने घर केले. या पाठचर्चेचे चांगलेच कौतुक झाले.
पाठाची यशस्विता –
अध्ययन-अनुभवांची योजना व शैक्षणिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यातून शैक्षणिक साध्य सहजसाध्य होते. लक्षपूर्वक ऐकणे, आपले विचार समर्पक शब्दांत मांडणे, प्रसंगानुरूप योग्य भाषेचा वापर करणे, भाषेची जडणघडण समजणे, सर्जनशील अभिव्यक्तीचा विकास यांसारख्या उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या दिशेने विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला.
ज्ञानरचनावादी अध्ययन-आपल्याकडे फुलपाखरांची संख्या वाढविण्यासाठी काय उपायोजना करता येतील, या प्रश्नातून ज्ञाननिर्मिती, फुलपाखरांच्या रंगछटांच्या निरीक्षणातून अभिव्यक्ती हा ज्ञानरचनावाद साध्य झाला.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, शिक्षण हक्क अधिकार यातील निर्देशांचा विचार –
फुलपाखराची जन्मावस्था, त्यांच्यातील वैविध्य, नवरत्ने, सर्कशीतला मृत्युगोल इत्यादी अध्ययन-अनुभवातून ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडता आले. वर्गातील मुलांना अभिव्यक्त होण्याची संधी दिल्याने लोकशाही धोरणांना प्राधान्यक्रम मिळाला. फुलपाखराची गोड कविता, इतर व्हिडीओ फिती, चित्रे यामुळे तणावरहित व आनंददायी अध्ययन झाले. माहितीचे ओझे कमी, घोकंपट्टीतून शिक्षणाची सोडवणूक या तत्त्वांचे पालन झाले.
मूल्ये, जीवनकौशल्ये, गाभा घटकांचा विचार –
लेखक फुलपाखरामागे धावतो तो केवळ त्याला पाहण्यासाठी, ही बाब मुलांच्या मनातील संवेदनशीलता, सौजन्यशीलतेला साद घालते. फुलपाखराच्या आकारात भेटकार्ड बनविताना मुलांमध्ये नेटकेपणाबरोबरच सर्जनशील विचारही रुजला. फुलपाखरू पकडले का, असा चिकित्सक विचार करून परिणामकारक संप्रेषण कसे करायचे, हे मुले शिकली. फुलपाखरांविषयीचे गाणे, चित्र, माहिती ओघानेच जाणून घेऊ या, हा मुलांचा समंजसपणा म्हणजे त्यांच्या भावनांचे समायोजन होते.
पाठात उल्लेखलेला स्वर्गीय नदीचा परिसर आपणाकडेही असावा यातून पर्यावरण संरक्षणाची भावना संक्रमित करता आली. फुलपाखराच्या जन्मक्रमाचे शास्त्रीय ज्ञान व्हिडीओ फितीतून मिळाल्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपोष अनायसे झाला. एकूणच ई-लर्निग संकल्पनेतून घेतलेल्या नमुना पाठातून खूपशा गोष्टी साध्य करता आल्या.
– रवींद्र जंगम
उपशिक्षक, जिल्हा परिषद केंद्र शाळा, राजुरी, फलटण, सातारा<br />संपर्क – ९८६०२२८६३३.




कप्पेबंद, साचेबंद वाटांनी न जाता आमच्यातलेच काही शिक्षक वेगळ्या वाटा चोखळताना दिसतात. आपलं शिकणं हे जगण्याचा भाग बनविताना दिसतात. हसतखेळत, मुलांच्या कलानं जाणारं हे शिक्षण दीर्घकाळ टिकतं. मुलांना जगायला शिकवतं आणि जीवन संजीवनी पुरवतं, असा अनुभव आहे. तुमच्या शाळेतही ‘असे चिरंतन शिक्षण’ देणारे उपक्रम सुरू असल्यास आम्हाला जरूर कळवा. उपक्रमांची माहिती पाठविताना छायाचित्रेही जरूर पाठवावी. संपर्कासाठी पत्ता- ‘चिरंतन शिक्षण’ लोकसत्ता, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१. दूरध्वनी- ६७४४००००. फॅक्स-२२८२२१८७
reshma.murkar@expressindia.com, reshma181@gmail.com