राज्य शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या बारावीच्या परक्षेचा निकाल ऐतिहासिक लागला असून यंदा मुंबई विभागानेही निकालात मुसंडी मारली आहे. विभागाचा निकाल मागच्या वर्षीच्या तुलनेत ११.४९ टक्क्यांनी वाढला आहे. याचबरोबर कोकण विभागाने यंदाही निकालात बाजी मारली असून राज्यात विभागाचा निकाल सर्वाधिक ९४.८५ टक्के इतका लागला आहे.
मुंबई विभागातून यंदा दोन लाख ८७ हजार ८१४ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी दोन लाख ५४ हजार १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुंबईचा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ८८.३० टक्के इतका लागला आहे. गत वर्षी हा निकाल ७६.८१ टक्के इतका लागला होता. मुंबई विभागातही मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल ९२.३४ टक्के इतका लागला आहे. यंदा निकालाचा टक्का चांगलाच वाढल्यामुळे मुंबईतील बहुतांश महाविद्यालयांचा निकाल हा ९० टक्क्यांच्या वर लागल्यामुळे महाविद्यालयांमध्ये जल्लोषाचे साजरा करण्यात आला.
मुंबई विभागात येणाऱ्या विविध जिल्ह्यांमध्ये यंदा रायगड विभागाने बाजी मारली आहे.
रायगड जिल्ह्याचा निकाल ९०.२३ टक्के लागला आहे. या खालोखाल विभागातील मुंबई उपनगर दोनचा निकाल ८९.७२ टक्के इतका लागला आहे.
कोकण विभागाचा निकालही मागच्यावर्षीच्या तुलनेत वाढला असून गतवर्षी तो ८५.८८ टक्के इतका लागला होता तर यंदा ९४.८५ टक्के इतका लागला आहे. या टक्केवारीसह कोकण विभाग सलग दुसऱ्या वर्षी अव्वल ठरला आहे. या विभागातही मुलींनी बाजी मारली असून मुलींचा निकाल ९६.८८ टक्के इतका लागला आहे. या विभागातून यंदा ३२ हजार ३९६ विद्यार्थी बसले होते यातील ३० हजार ७२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
मुंबईत शाखा निहाय टक्केवारीतही कमालीचा वाढ झाली असून विभागाचा विज्ञान शाखेचा निकाल मागील वर्षी ८७.५५ टक्के इतका होता तर या वर्षी तो ९०.७१ टक्के इतका लागला आहे. कला शाखेचा निकाल गतवर्षी ६७.२५ टक्के इतका होता या निकालामध्ये १७.४० टक्क्यांनी वाढ होऊन हा निकाल यंदा ८४.६५ टक्के इतका लागला आहे.
वाणिज्य शाखेचा निकाल गतवर्षी ७३.१६ टक्के होता तर हा निकाल यंदा ८७.९१ टक्के इतका लागला आहे.