पश्चिम विभागीय युवा महोत्सवामध्ये विजयाची पताका फडकावत मुंबई विद्यापीठाने सर्व स्पर्धामध्ये आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे.
‘असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्‍‌र्हसिटीज’तर्फे या महोत्सवाचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे हे महोत्सवाचे ३० ने वर्ष होते. साहित्य, फाईन आर्ट्स, नाटक, संगीत आणि नृत्य या पाच विभागांतील स्पर्धामध्ये विद्यापीठाने ही कामगिरी गेली आहे. मुंबई विद्यापीठाने यात एकूण ८७ गुणांची कमाई करत युवा महोत्सवाचा चषक आपल्याकडे राखला आहे.
मुंबई विद्यापीठापाठोपाठ एसएनडीटी विद्यापीठाने ४० गुणांची कमाई करत दुसरा क्रमांक पटकावला. तर बनस्थाली विद्यापीठाने ३७ गुण मिळवित तिसरा क्रमांक मिळविला. या महोत्सवात महाराष्ट्रासह गोवा, गुजरात आणि राजस्थान येथील ३६ विद्यापीठांनी भाग घेतला होता. या विद्यापीठांमध्ये रंगलेल्या या सोहळ्यात विद्यापीठाने ५ पैकी चार चषकांवर आपली मोहोर उमटवली.
अजमेरच्या महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आता विद्यापीठाच्या कला चमूला ला २ ते ६ फेब्रुवारीला इंदूर येथे रंगणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे वेध लागले आहेत. या महोत्सवातही आपले वर्चस्व कायम राखू, अशा आशावाद विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.