स्वत:ची बाजू मांडण्याची संधी न देता तडकाफडकी निलंबनाला सामोरे जावे लागलेले अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांचे उदाहरण विद्यापीठातील एकमेव नसून डॉ. राजन वेळुकर यांच्या कारकीर्दीत अनेक वरिष्ठ अधिकारी या पद्धतीने कुलगुरूंच्या रोषाला बळी पडले आहेत.
विद्यापीठाचे माजी कुलसचिव के. वेंकटरमणी, परीक्षा नियंत्रक विलास शिंदे आणि विद्यापीठाच्या सेंट्रल कॉम्प्युटिंग फॅसिलिटीचे प्रमुख दुर्गेश मुझुमदार यांना या पद्धतीने निलंबित करण्यात आले. गंभीर बाब म्हणजे निलंबनानंतर झालेल्या चौकशीत या तिघांनाही ‘क्लीन चीट’ मिळाली होती. मात्र, तरीही त्यांना त्यांच्या पदावर पुन्हा रुजू करून घेण्यात आले नाही. त्यामुळे, डॉ. हातेकर यांच्या निलंबनामुळे कुलगुरू वेळुकर यांच्या कार्यपद्धतीविषयी विद्यापीठ अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये असलेली नाराजीची भावना आणखी तीव्र झाली आहे.
या तिघांनाही व्यवस्थापन परिषदेत विशेष ठराव आणून निलंबित करण्यात आले होते. अधिकाऱ्यांना व प्राध्यापकांना या पद्धतीने निलंबित करण्याच्या कुलगुरुंच्या कार्यपद्धतीविषयी विद्यापीठात मोठी नाराजी आहे. डॉ. हातेकर यांच्या बाबतीत तर व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य डॉ. मधू परांजपे यांनीही ही कारवाई चुकीची असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून दिले होते. ज्याच्याविषयी तक्रार आहे त्या अधिकाऱ्याने आपल्या अधिकारांचा गैरवापर करून एखादा पुरावा नष्ट करण्याचा किंवा साक्षीदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये यासाठी कुलगुरूंना विशेषाधिकार देण्यात आले आहेत. पण, डॉ. हातेकर यांच्या बाबतीत असा कोणताच प्रश्न नव्हता, अशी प्रतिक्रिया प्रा. वेंकटरमणी यांनी व्यक्त केली.