विद्यापीठांची संलग्नता असल्याशिवाय अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिये’त (कॅप) महाविद्यालयांना सहभागी करून घेणार नाही, असे तंत्रशिक्षण संचालनालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे वर्षांनुवर्षे विद्यापीठाची तात्पुरती किंवा कायमस्वरूपी अशी कोणतीही संलग्नता न घेता प्रवेश करणाऱ्या संस्थांची चांगलीच अडचण झाली आहे. संचालनालयाकडून दट्टय़ा मिळाल्यामुळे मुंबई विद्यापीठासारख्या विद्यापीठांनी तातडीने संलग्नतेची प्रक्रिया सुरू केली असून महाविद्यालयांमध्ये ‘स्थानिय चौकशी समित्या’ धाडण्यास सुरूवात केली आहे.
मुंबईप्रमाणे अनेक विद्यापीठांमध्ये गेली कित्येक वर्षे संलग्नतेची प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. मुंबईत तर महाविद्यालयांनी संलग्नतेच्या प्रक्रियेकरिता आवश्यक असलेले शुल्कही विद्यापीठाकडे जमा केले आहे. परंतु, विद्यापीठाने गेली चारपाच वर्षे ही महत्त्वाची प्रक्रियाच आपल्या कामाच्या यादीतून गुंडाळून टाकली होती. परिणामी विद्यापीठाची कोणत्याही प्रकारची संलग्लता नसताना संचालनालय त्यांचे प्रवेश करीत होते की जे नियमाबाह्य़ होते. मुक्ता या शिक्षकांच्या संघटनेने या संबंधात संचालनालयाला पत्र लिहून ही त्रुटी लक्षात आणून दिली होती. त्यावर संचालनालयाने आधी विद्यापीठांना पत्र लिहून संलग्नता असलेल्या संस्थाचेच कॅपद्वारे प्रवेश करू असे स्पष्ट केले होते. आता संस्थांच्या माहितीकरिता ही भूमिका पुन्हा एकदा आपल्या संकेतस्थळावर संचालनालयाने जाहीर केली आहे. संस्थेचे अभ्यासक्रम, विद्याशाखा व मंजूर प्रवेश क्षमता या सर्व घटकांना विद्यापीठाचे संलग्नीकरणाचे आदेश प्राप्त झाल्यानंतरच संबंधित संस्थेला कॅपमध्ये सहभागी करून घेण्यात येईल, असे संचालनालयाने स्पष्ट केले आहे.