शिष्यवृत्तीच्या परीक्षार्थीमध्ये तब्बल पाच वर्षांनी वाढ

चौथीच्या व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षार्थीची गेल्या पाच वर्षांत सुमारे एक-एक लाखाने कमी झालेली संख्या यंदा चौथीच्या परीक्षार्थीच्या संख्येत भर पडल्याने तब्बल ३० हजारांनी वाढली आहे.

चौथीच्या व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षार्थीची गेल्या पाच वर्षांत सुमारे एक-एक लाखाने कमी झालेली संख्या यंदा चौथीच्या परीक्षार्थीच्या संख्येत भर पडल्याने तब्बल ३० हजारांनी वाढली आहे. सातवीच्या परीक्षार्थीची संख्या मात्र १० हजाराने कमी झाली आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा ऐच्छिक असल्याने शाळा व पालक विद्यार्थ्यांना किती प्रोत्साहन देतात यावर दरवर्षी परीक्षार्थीची संख्या अवलंबून असते. २००९ साली २१ लाख विद्यार्थी चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्तीला बसले होते, मात्र तेव्हापासून गेल्या वर्षीपर्यंत शाळा आणि विद्यार्थीसंख्या वाढूनही शाळांच्या निरुत्साहामुळे सुमारे एक-एक लाखाने परीक्षार्थीची संख्या घटत होती, परंतु यंदा चौथीचे परीक्षार्थी ३९,२३६ हजारांनी वाढले आहेत. सातवीचे परीक्षार्थी मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ९,८६२ने कमी झाले आहेत, अशी माहिती या परीक्षेचे आयोजक ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे’चे उपायुक्त राजेश क्षीरसागर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. १६ जानेवारीपर्यंत या परीक्षेकरिता अनुक्रमे ९,२९,९७५ आणि ६,६८,९२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. अतिविलंब शुल्कासह परीक्षेकरिता ७ मार्चपर्यंत अर्ज भरून घेतले जाणार आहेत. त्यामुळे यात आणखी विद्यार्थ्यांची भर पडेल, अशी अपेक्षा परिषदेचे आयुक्त व्ही. बी. पायमल यांनी व्यक्त केली. आतापर्यंत तब्बल ११३ शाळांमधील विद्यार्थ्यांनी या परीक्षांकरिता नोंदणी केली आहे. चौथीच्या परीक्षेच्या स्वरूपात यंदा अभ्यासक्रमानुसार बदल करण्यात आला असून सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना चौथीच्या पेपर २च्या वेळी आणि सातवीच्या पेपर २ व ३च्या वेळी मूळ माध्यमासह इंग्रजी माध्यमातूनही प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाईल.

‘बार्टी’ शिष्यवृत्ती
यंदा पुण्याच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे’तर्फे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती योजना’ (बार्टी) जाहीर करण्यात आली आहे. त्या अंतर्गत अनुसूचित जातीतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या योजनेंतर्गत मार्च, २०१४च्या बार्टीने घोषित केलेल्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या जिल्हानिहाय याद्या परिषदेच्या http://www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Scholarship students number rise

ताज्या बातम्या