scorecardresearch

मुले अजूनही शालाबाह्य़च..

राज्यात गेल्यावर्षी जुलै महिन्यात शालाबाह्य़ मुलांची पाहणी करण्यात आली.

शिक्षण विभागाची मोहीम थंडावली

गेल्या वर्षी शिक्षण विभागाचा जुलै महिना गाजला तो ‘शालाबाह्य़’ मुलांच्या प्रश्नामुळे. या वर्षी मात्र शालाबाह्य़ मुलांना शाळेपर्यंत आणण्याची शिक्षण विभागाची मोहीम थंडावल्याचे दिसत आहे. गेले शैक्षणिक वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून चार वेळा सर्वेक्षण करून, शिक्षण हमी कार्ड वाटून अद्यापही मुले शालाबाह्य़च आहेत आणि हे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिने होत आले, तरीही शिक्षण विभागाला या मुलांची अद्याप आठवण झालेली नाही.

राज्यात गेल्यावर्षी जुलै महिन्यात शालाबाह्य़ मुलांची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये अवघी ५० हजार मुलेच शालाबाह्य़ असल्याची नोंद शिक्षण विभागाने केल्यामुळे हे सर्वेक्षण वादात सापडले. त्यानंतर तीन वेळा हे सर्वेक्षण करण्यात आले. स्थलांतरित मजुरांच्या मुलांसाठी स्वतंत्रपणे सर्वेक्षण करण्यात आले तरीही अद्याप हजारो विद्यार्थी शालाबाह्य़च आहेत. राज्यातील बहुतेक सर्वच शहरांतील बस स्थानके, मुख्य चौक, रेल्वे स्थानके, बांधकामाची ठिकाणे याची साक्ष देतात.

गेल्या वर्षी सर्वेक्षणाची आणि मुलांना शाळेत दाखल करून घेण्याची मोहीम डिसेंबर-जानेवारीपर्यंत चालली. शालाबाह्य़ सापडलेल्या अनेक मुलांची शाळेत नोंद झाली. मात्र यातील किती मुले प्रत्यक्षात वर्गापर्यंत पोहोचली याची दखल विभागाने घेतलेली नाही. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी मोहीम लांबल्यामुळे या मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले. या वर्षांतही विभागाला अद्याप शालाबाह्य़ मुलांची आठवण झालेली नाही. त्यामुळे शाळा सुरू होऊन तीन महिने झाले, तरीही किती मुले शालाबाह्य़ आहेत त्यांची नोंदही शिक्षण विभागाने अद्याप घेतलेली नाही.

शालाबाह्य़ मुलांचा प्रश्न सोडवण्यात सामाजिक सहभागाचीही गरज आहे. या वर्षीही या मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शाळेत दाखल करून घेण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे. पावसाळा संपला की ही मोहीम राबवण्यात येईल. त्यामध्ये लोकसहभाग वाढावा यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.

-विनोद तावडे, शिक्षणमंत्री

मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज ( Kgtocollege ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: School children issue

ताज्या बातम्या