प्राध्यापक पदासाठी घेण्यात आलेल्या ‘सेट’ परीक्षेच्या केवळ इंग्रजी विषयाच्याच नव्हे तर सामाइक (पेपर -१), वाणिज्य, हिंदी आदी विषयांच्या अंतिम उत्तरसूचीतही चुका कायम राहिल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
१ डिसेंबर, २०१३ रोजी पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षा घेण्यात आली. परीक्षा झाल्यानंतर लगेचच अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची जाहीर करण्यात आली. या उत्तरसूचीवर उमेदवारांच्या सूचना मागविल्यानंतर विद्यापीठाने अंतिम उत्तरसूची (ज्याच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे) जाहीर केली. मात्र यातील पेपर क्रमांक एक (सामान्य) मधील संच (अ)मधील ३९ व ४५ हे प्रश्न चुकीचे असल्याची उमेदवारांची तक्रार आहे. हे प्रश्न तक्त्यावरून सोडवायचे होते. यापैकी ३९ क्रमांकाच्या प्रश्नाचा वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करता एकतर हा प्रश्न चुकीचा विचारला गेला आहे. अथवा या प्रश्नाचे चारही पर्याय चुकीचे देण्यात आले आहेत. तर ४५ क्रमांकाच्या प्रश्नाचे चारही पर्याय चुकीचे आहेत, असे परीक्षार्थीचे म्हणणे आहे. पण, या चुका सेटच्या अंतिम उत्तर सूचीतही कायम ठेवण्यात आल्या आहेत.
वाणिज्य विषयाच्या पेपर क्रमांक दोन मधील प्रश्न क्रमांक ३९ हा वेतन टप्पा रचनेविषयी होता. या प्रश्नाचे उत्तर अंतरिम उत्तर सूचीत नमूद केले होते ते बरोबर होते. मात्र, अंतिम उत्तरसूचीत याचे उत्तर चुकविण्यात आले आहे, असा उमेदवारांचे म्हणणे आहे. हिंदीमध्येही याच प्रकारच्या चुका अंतिम सूचीमध्ये करून ठेवल्याची उमेदवारांची तक्रार आहे.
याआधी इंग्रजी विषयासाठी घेण्यात आलेल्या ‘सेट’ परीक्षेतील दोन प्रश्नांची उत्तरे चुकीची असूनही अंतिम उत्तरसूचीत दुरूस्त न करता कशी कायम ठेवण्यात आली होती, या बाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने १ एप्रिलच्या अंकात प्रकाशित केले होते. अंतरिम उत्तर सूची जाहीर झाल्यानंतर या चुका लक्षात आणून दिल्यानंतरही विद्यापीठाने त्या दुरूस्त करण्याची तसदी घेतली नाही. सेटचा निकाल एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात अपेक्षित आहे. किमान निकाल जाहीर करताना तरी विद्यापीठाने अंतिम उत्तरसूचीमधील चुकांची दखल घेत त्यानुसार निकाल लावावा, अशी मागणी एका परीक्षार्थीने केली.