बढती मिळवण्यासाठी राज्यातील प्राथमिक शिक्षकांना सध्या एक सोपा मार्ग सापडला आहे. राज्यातील अनेक जिल्हापरिषदांमध्ये ‘हिंदी साहित्य संमेलन, प्रयाग अलाहाबाद’ या विद्यापीठाची पदवीप्रमाणपत्रे दाखवून शिक्षकांनी बढतीसाठी अर्ज केले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या विद्यापीठाची प्रमाणपत्रे देणाऱ्या शिक्षकांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे दिसत आहे. मात्र, या पदवीला मान्यता नसतानाही शिक्षण विभागाच्या संदिग्ध भूमिकेमुळे गोंधळ वाढला आहे.
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने, विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिलेल्या विद्यापीठांच्याच पदव्यांच्या विचार बढतीसाठी करणे बंधनकारक आहे. मात्र, या दोन्हींचीही मान्यता नसलेले ‘हिंदी साहित्य संमेलन, प्रयाग अलाहाबाद’ हे विद्यापीठ सध्या राज्यातील प्राथमिक शिक्षकांमध्ये लोकप्रिय ठरले आहे. या विद्यापीठाची पदवी दाखवून बढती मिळवण्याच्या प्रयत्नात राज्यातील हजारो शिक्षक सध्या आहेत.
सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नाशिक यांसह अनेक जिल्हा परिषदांमधील शिक्षकांनी प्रयाग विद्यापीठाची प्रमाणपत्रे सादर केली आहेत. गेल्यावर्षी काही जिल्हा परिषदांनी प्रयाग विद्यापीठाच्या प्रमाणपत्राच्या आधारे पद्दोन्नती दिली होती. त्या पाश्र्वभूमीवर यावर्षी या विद्यापीठाचे पदवीचे प्रमाणपत्र सादर करून ते बी.एड. साठी समकक्ष असल्याचे दाखवून पदोन्नतीसाठी अर्ज करणाऱ्या शिक्षकांची संख्या जवळपास दुपटीने वाढली आहे.

बढतीच्या प्रयत्नांना ऊत
राज्याबाहेरील विद्यापीठांच्या पदव्या पदोन्नतीसाठी ग्राह्य़ धरण्यात येऊ नयेत, असा निर्णय शासनाने यापूर्वीच जाहीर केला आहे. यात कोणताही बदल झाला नाही. मात्र, गेल्यावर्षी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी काढलेल्या संदिग्ध पत्रांमुळे अशा पदव्यांच्या आधारे पदोन्नती मागणाऱ्यांना रानच मोकळे झाले आहे. याबाबत राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालक आणि सहसंचालकांनी तीन पत्रे काढली. मात्र, त्यामध्ये ‘प्रयाग’ विद्यापीठाची ‘हिंदी शिक्षक विशारद’ ही पदवी पदोन्नतीसाठी गृहीत धरण्यात येऊ नये, असा स्पष्ट उल्लेख नाही.