शाळा सुधार प्रकल्प, रूम टू रिड, टॅब, सरल, इयत्ता पाचवीच्या नव्या अभ्यासक्रम आदींचे प्रशिक्षण घेत असतानाच पालिका शाळांमधील शिक्षकांना ब्रिटिश कौन्सिलमधून इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण घेण्याची सक्ती करण्यात आली आहे. दरदिवशी सुमारे एक हजार शिक्षक शाळेत न जाता प्रशिक्षणासाठी हजेरी लावत असून शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. शाळेतील उपस्थित शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त भार वाढू लागला आहे. तर दुसरीकडे दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांची संख्याही वाढू लागली आहे.
पालिका शाळांचा दर्जा वाढावा या उद्देशाने शिक्षकांना ब्रिटिश कौन्सिलच्या माध्यमातून इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.

पालिकेची शाळा शनिवारी अर्धा दिवस असते. त्यामुळे स्वतंत्र प्रशिक्षक नेमून शनिवारी शाळेतच सर्व शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे. शनिवारी अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांना सोमवारी प्रशिक्षण द्यावे. अथवा व्हच्र्युअल क्लासरूमच्या माध्यमातून शिक्षकांना इंग्रजीचे प्रशिक्षण द्यावे. त्यामुळे शाळांमधील शिक्षकांच्या अनुपस्थितीचा प्रश्न सुटेल आणि विद्यार्थ्यांचेही नुकसान होणार नाही.
– शिवनाथ दराडे, सदस्य, शिक्षण समिती