शिक्षकांना निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी सुटी हवी

निवडणूक आयोगाने लावलेल्या अतिरिक्त प्रशिक्षणामुळे शिक्षकांवर पडणारा ताण लक्षात घेता त्यांना निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी द्यावी ही मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे.

निवडणूक आयोगाने लावलेल्या अतिरिक्त प्रशिक्षणामुळे शिक्षकांवर पडणारा ताण लक्षात घेता त्यांना निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी द्यावी ही मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे. शिक्षकांची ही मागणी मान्य व्हावी यासाठी आता शिक्षक आमदारही मैदानात उतरले असून त्यांनी शिक्षण विभागाला पत्र लिहून सुट्टीची मागणी केली आहे.
निवडणुकीचे काम त्याचबरोबरीने सध्या सुरू असलेल्या परीक्षांचे काम या सर्वाच्या ताणामुळे शिक्षकवर्ग सध्या प्रचंड ताणाखाली आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी शिक्षकांना काम संपवून घरी जाण्यास रात्री उशीर होतो. मतदानाच्या आदल्या दिवसापासून काही कर्मचारी कामास सुरुवात करतात. यामुळे अनेकदा शिक्षकांना २४ तासांहून अधिक काळ सतत काम करावे लागते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन शिक्षकांना निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ ऑक्टोबर रोजी सुट्टी द्यावी अशी मागणी यापूर्वीच शिक्षक भारतीतर्फे करण्यात आली होती. अशीच मागणी आता पुन्हा शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनीही शिक्षण सचिवांकडे केली आहे. यामुळे सुट्टीची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. पण याबाबत शासन कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही. प्रत्यक्ष मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सुट्टीची मागणी काही नवीन नसल्याचे शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले आहे. मतदानाच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत काम चालते यामुळे दुसऱ्या दिवशी अनेक कर्मचारी कामावर जात नसल्याची परंपरा आहे, त्या वेळेस त्यांना ‘ऑन डय़ुटी’ गृहीत धरले जाते असेही भिडे यांनी स्पष्ट केले.   

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Teachers want leave after election day