गोंधळाची परंपरा राखत राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी झाली. गोंदिया, बीड या जिल्ह्य़ांमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याच्या चर्चा दिवसभर विद्यार्थ्यांमध्ये होती. मात्र, प्रश्नपत्रिका फुटली नसून राज्यात परीक्षा सुरळीत झाल्याचा दावा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केला आहे. भावी गुरुजींनी या परीक्षेत कॉपीचाही आधार घेतला आहे.
राज्यभरात १ हजार ३६२ परीक्षा केंद्रांवर रविवारी टीईटी झाली. गोंदिया आणि बीड जिल्ह्य़ांत प्रश्नपत्रिका फुटल्याची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये होती. परीक्षेच्या सकाळच्या सत्रात बीडमधील यशवंतराव चव्हाण तंत्रशिक्षण महाविद्यालयात या परीक्षेचे केंद्र होते. या केंद्रावरील दोन विद्यार्थ्यांकडे सोडवलेल्या उत्तरपत्रिका सापडल्या. सापडलेल्या उत्तरपत्रिकांमधील दीडशेही प्रश्न सोडवलेले होते. या उत्तरपत्रिका परीक्षा परिषदेकडे पाठवण्यात आल्या आहेत. मात्र, हा प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार नसून कॉपी असल्याचे परीक्षा परिषदेचे म्हणणे आहे. गोंदिया जिल्ह्य़ातही असाच काहीसा प्रकार उघडकीस आला आहे. काही विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर उत्तरपत्रिका आढळून आल्या. भविष्यात शिक्षक म्हणून काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी टीईटीमध्ये कॉपीचा आधार घेतला आहे. प्राथमिक अहवालानुसार राज्यात ३५ ते ४० गैरमार्गाचे प्रकार नोंदविण्यात आले आहेत, असे परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. उर्दू माध्यमातील प्रश्नपत्रिका परिषदेने हाताने लिहिलेल्याच दिल्या होत्या. त्यावर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. यावर्षी राज्यातील ४ लाख १४ हजार ८१८ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

‘‘प्रश्नपत्रिका फुटलेली नाही. बीडमध्ये विद्यार्थ्यांकडे दोन उत्तरपत्रिका आढळून आल्या हे खरे आहे, मात्र त्या परीक्षा संपण्यापूर्वी अर्धा तास आधी मिळाल्या. त्यामुळे कॉपी म्हणून त्याची नोंद करण्यात आली आहे. या उत्तरपत्रिकांची तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. गोंदियामध्ये मोबाइलवर आढळलेला तपशील आणि प्रश्नपत्रिकेत काहीही साधम्र्य नव्हते.’’
– व्ही. बी. पायमल, आयुक्त, परीक्षा परिषद