व्यवस्थापन विषयक शिक्षण देणाऱ्या ‘वेलिंगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’ (वुई स्कूल)या संस्थेला उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘एआयसीटीई-सीआयआय बेस्ट इंडस्ट्री लिंक्ड मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट’ या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्लीत ‘एआयसीटीई-सीआयआय’च्या पाचव्या ‘ग्लोबल युनिव्हर्सिटी इंडस्ट्री काँग्रेस’ परिषदेत हा पुरस्कार ‘वुई स्कूल’चे समूह संचालक प्रो. डॉ. उदय साळुंखे यांना प्रदान करण्यात आला.
पुरस्काराबद्दल ‘वुई स्कूल’चे अभिनंदन करताना या संस्थेने विविध उद्योगक्षेत्रांशी उत्तम नातेसंबंध प्रस्थापित करून, त्यांचा फायदा आपल्या तरूण विद्यार्थ्यांच्या कौशल्यांची वृध्दी करून त्यांना विविध उद्योगातील जबाबदाऱ्यांची आव्हाने पेलण्यासाठी परिपूर्ण बनवण्यासाठी करून दिला आहे, असे ‘एआयसीटीई’चे अध्यक्ष अनिल सहस्त्रबुध्दे यांनी सांगितले.
आता या क्षेत्रातील आपल्या अनुभवाचा फायदा देशातील इतर शिक्षणसंस्थांना करून देण्यासाठी ‘वुई स्कूल’ने आघाडी घेतली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पुरस्कारांसाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षणसंस्थांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. यावर्षी देशातील १२२५ संस्थांनी ‘एआयसीटीई-सीआयआय’च्या स्पर्धात्मक सर्वेक्षणात सहभाग नोंदवून चांगली चुरस निर्माण केली.
– डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे, अध्यक्ष एआयसीटीई