21 October 2018

News Flash

अपोषणी

नमस्कार! गेले वर्षभर आपणा सर्वाशी या सदराद्वारे संवाद साधला.

नमस्कार! गेले वर्षभर आपणा सर्वाशी या सदराद्वारे संवाद साधला. तुम्हीसुद्धा लेख आवडल्याची पोचपावती त्या त्या वेळी तत्परतेने दिलीत. कधी परखडपणे चुका दाखवल्या. कधी काही वेगळे विषय सुचवले, कधी काही शंका विचारल्या. या सर्वामधून एक जाणवले, की हल्ली लोक खाण्यापिण्याकडे निव्वळ पोट भरणे या उदासीन वृत्तीतून न पाहता एक आनंदानुभव म्हणून पाहतात. या सदराचे नावच आहे ‘खाऊ आनंदे!’

जेवण हा एक सामाजिक अनुभव असतो, असे मला वाटते. म्हणजे खाणं हे वैयक्तिक असतं, पण तो जेव्हा चारचौघांसोबत पार पडतो तेव्हा अधिक खुलतो. मुख्य म्हणजे एक प्रकारचा ‘फील गुड’ भाव जाणवतो. आपल्याकडे सध्या खाणेपिणे आणि त्यावर व्यक्त होणे सार्वत्रिक झाले आहे. सोशल मीडियाची कृपा! अनेक माध्यमांतून अमुक एक छान आहे किंवा काही तरी वेगळे आहे. अशा असंख्य पोस्ट इंस्टाग्राम, ब्लॉग, फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप याद्वारे फिरत राहतात. अनेक सुप्त लेखकू यामुळे अभिव्यक्त होऊ लागले आहेत. या माध्यमांतील आद्य आणि प्रभावी माध्यम म्हणजे वर्तमानपत्र! आजही वर्तमानपत्रांमधील रिव्ह्य़ू वाचून म्हणा किंवा फोटो पाहून म्हणा, लोक, वाचक मते ठरवतात. या दृष्टीने आजही वर्तमानपत्राची ही बांधिलकी अबाधित आहे, असे म्हणायला हरकत नसावी. याला कारण म्हणजे त्या वर्तमानपत्राचा इतिहास किंवा पाश्र्वभूमी यातून जे प्रसिद्ध होते ते दर्जेदार आणि चोख असते हा वाचकांचा विश्वास.

‘खाऊ आनंदे’ या सदरातून वेगवेगळे विषय हाताळले गेले. फक्त पदार्थ जंत्री नव्हे तर एकूणच या क्षेत्रामध्ये होणारे स्थित्यंतर, वेगळे प्रयोग, हटके असणाऱ्या आणि लोकांना माहीत नसलेल्या अनेक गोष्टी यावर भर दिला. उदाहरण द्यायचे तर भिन्नमती किंवा अपंग व्यक्तींनी समर्थपणे सांभाळलेले रेस्टॉरंट/डबा सेवा. अपंग येथे काही कर्तबगारी दाखवतात हे समाजाला माहीत असतेच असे नाही. हा उपक्रम समोर आल्याने अनेकांना माहिती झाली, मार्ग मिळाला. उदाहरण द्यायचे तर आदिती वर्मा या मुलीच्या बेलापूरमधील कॅफेबद्दल लोकांना कळले आणि तिच्या कॅफेमधील वर्दळ तर वाढलीच, पण अन्य अनेक जागी मुलाखतीसुद्धा झाल्या.

तेच ‘फूड ट्रक’विषयी. ठेलेवाले, हातगाडीवाले किंवा वडापाव, भेळ, समोसे असे गाडीवर विकणारे विक्रेते आपल्याला माहीत आहेत; पण सध्या या हातगाडीवाल्यांना अत्यंत आधुनिक रूप आले आहे आणि असंख्य तरुण उद्योजक यात उतरत आहेत हे लोकांना फारसे माहीत नव्हते. ‘फिरत्या चाकावरती’ या फूड ट्रकवरच्या लेखामुळे खाण्याच्या क्षेत्रातील हा आगळावेगळा प्रकार वाचकांना कळला. मुख्य म्हणजे आपल्या परिसरात किंवा कार्यालयात अशी सेवा उपलब्ध आहे याची माहिती खवय्यांना म्हणा किंवा लोकांना मिळाली. ज्यातून ‘फूड ट्रक’ची चांगली व्यवसायवृद्धी झाली.

मासे व्यवसायांचे आधुनिक रूप ‘अथ तो मत्स्यजिज्ञासा’मधून समोर आले. या लेखात उल्लेख केलेल्या व्यावसायिकांच्या उद्योगात लक्षणीय वाढ झाली. ‘लंचबॉक्स’ या लेखांमधून मागणीप्रमाणे डाएट डबा पुरवणारे होतकरू तरुण उद्योजक लोकांसमोर आले. वर उल्लेख केलेले सर्व प्रकार उद्योग किंवा व्यक्ती याआधीही अस्तित्वात होतेच; पण त्यांना अधिक समाजाभिमुख करण्याचे मोठे काम या सदरातून झाले असे मला वाटते. हे झाले व्यवसाय उद्योगांबद्दल; पण ‘खाऊ आनंदे’मध्ये काही लोकप्रिय पदार्थ त्यांचे झालेले भारतीय संस्करण यावरचे लेखही वाचकांना खूप आवडले. उदाहरणार्थ ‘तिखा मारके टोश्टेड!’ हा सँडविचबद्दलचा लेख वाचकांना प्रचंड आवडला. रोजच्या पाहण्यातली गोष्ट, पण कशी बदलली हे कळले. तेच समोशाबद्दल किंवा अंडय़ाबद्दल.

खाण्यापिण्याबद्दल जेव्हा लिहिले जाते तेव्हा हे चांगले आणि हे वाईट एवढेच लिहिणे अभिप्रेत नसते, तर अमुक चांगले का? तमुक वाईट कशासाठी? हे व्यवस्थित समजणे गरजेचे असते. इथे हे हे पदार्थ चांगले मिळतात, अशा तऱ्हेचे साचेबद्ध वर्णन म्हणजे खाण्यावर लिहिणे नव्हे. तो पदार्थ का आवडला हे आधी सांगावे लागते. उदाहरण द्यायचे तर ‘चला पाणीपुरी पिऊ’ हा मॉलिक्युलर गॅस्ट्रॉनॉमीवरचा लेख. आपल्याकडे हा प्रकार आजही काही सन्माननीय अपवाद वगळता जनतेला फारसा माहीत नाही. पारंपरिक पाककृतीपेक्षा संपूर्ण वेगळे असे इथे घडते ते नक्की काय? त्यामागील हेतू कोणता? कोणते पदार्थ कुठे कसे मिळतात? या सर्वाबद्दल प्रस्तुत लेखात लिहिले आणि वाचकांना एका नव्या प्रकारची माहिती झाली.

खाणेपिणे तर असतेच, पण त्या अनुषंगाने येणारी भांडी, बशा, ग्लासेस यांचेही एक स्वतंत्र अस्तित्व असते. अभिजात रेस्टॉरंटमध्ये म्हणा किंवा तत्सम ठिकाणी कोणता पदार्थ कसा वाढवा या बाबतीतील नियम अगदी काटेकोर असतात ज्याबद्दल विशेष माहिती नसते. या क्षेत्रातील वेगळे ट्रेण्ड, नवे प्रघात यांच्याबद्दल मनोरंजक माहिती ‘राहील परी चव ती कायम’ या लेखातून दिली. हॉटेल/ रेस्टॉरंटमधील मुख्य असणारे मसाले, सॉस.. थोडक्यात पडद्यामागचे कलाकार ‘बेसिक किचनची किमया’ या लेखातून सामोरे आले ‘अन्नपूर्णाची खाद्य चॅनेल्स’मधून यूटय़ूबवरच्या  डिजिटल सुगरणी लोकांना अधिक माहीत झाल्या. खाणेपिणे आणि इतिहास आणि पर्यटन यांची नवी सांगड घातली गेली. ‘फूड वॉक टूर शेर्पा’ या लेखातून उमगले की, खाण्याला मोठा इतिहास असतो आणि सध्या फूड टुरिझम महत्त्वाचे कसे झाले आहे?

थोडक्यात काय, फक्त जंत्री न देता एकूणच ‘खाणे’ या विषयाला वेगवेगळ्या अंगांनी पाहण्याचा मनापासून प्रयत्न केला. यातून काही अनवट विषय गवसले आणि ते लेखाद्वारे व्यक्त झाले. उदाहरणार्थ फोडणी आपल्या रोजच्या परिचयातली; पण तिचे असंख्य प्रकार, ती का निर्माण झाली? याबद्दल जसजशी माहिती घेत गेले तसतशी या फोडणीचे तडतडणे का कसे, कधी, केव्हा ते उमगू लागले ज्यामधून एक ठसकेदार लेख निर्माण झाला. आपल्याला रोजच्या जेवणातल्या डाळी. संपूर्ण भारतात किती प्रकारे कशा शिजतात हे शोधणे अत्यंत मनोरंजक होते. तो मजेशीर अनुभव ‘दाल-रोटी खाओ’ या लेखातून व्यक्त झाला. रोजच्या आयुष्यातले असंख्य पदार्थ विषयाच्या रूपात समोर असतात, गरज असते ती ते शोधून त्यांचे वेगळेपण टिपण्याची! हा वेगळेपणा टिपायला मला आवडतो ज्यातून काही हटके विषय समोर येतात. अर्थात अशा विषयांवरील लेख मंजूर करणे यालाही धाडस लागते जे संपादकीय विभागाने दाखवले. ज्यातून विविध विषय मला हाताळता आले. त्याबद्दल ‘लोकसत्ता’, ‘चतुरंग’चे मनपूर्वक आभार!

या सदरातली ही खाद्य मफल आज संपते आहे. जेवण संपवून ‘अपोषणी’ घ्यायची वेळ आलेली आहे. तृप्त मनाने समारोप करताना आपणा सर्वाना असाच चवदार अनुभव नित्य लाभून आयुष्य एक रंगतदार मफल होत जावी ही मन:पूर्वक इच्छा! लोभ आहेच. तो अधिक चवीने वृद्धिंगत व्हावा, ही विनंती.

शुभा प्रभू साटम

shubhaprabhusatam@gmail.com

(सदर समाप्त)

First Published on December 23, 2017 4:36 am

Web Title: 2017 last food articles in chaturang