ताजे मासे ओळखता येत नाहीत, वेळ नाही किंवा मच्छीबाजार जवळ नाही.. कारणे काहीही असोत पण त्याने जन्म दिलाय तो हायटेक मासेविक्रीला. सध्या मुंबई, पुण्यात ऑनलाइन मासे विक्री किंवा चक्क फोन करून, व्हॉट्स अ‍ॅप मेसेज करून घरपोच मासे डिलिव्हरी सेवा सुरू झाल्या आहेत. आणि कौतुकास्पद म्हणजे त्यात काही परंपरागत कोळी व्यवसायाची पाश्र्वभूमी असलेले आहेत तर काही चक्क फॉरेन र्टिन उच्चविद्याविभूषित स्त्री-पुरुषही आहेत. ऑनलाइन/ डायल डिलिव्हरी सेवा देणारा हा मत्स्य व्यवसाय हायटेक होऊन आता तुमच्या थेट दारात आलाय..

अनेक वर्षांपूर्वी जयवंत दळवी की पु. लं. यांचा एक लेख वाचला होता. दोघेही मत्स्यभक्त असल्याने माशांचे रसभरीत वर्णन त्यात होते आणि मत्साहारी घरातला मासे खरेदी प्रघात कसा असतो यावर लिहिलेले होते की.. मासे खाणाऱ्या घरात खास मासे खरेदीची एक निळी किंवा खाकी रंगाची जाडसर कापडाची दणकट पिशवी असतेच असते, बाजार (जातिवंत मासेखाऊ माशांना बाजारच म्हणतात) आणायची. आणि ही पिशवी जपानी राजाच्या झग्यासारखी एकदाच वापरायची नसते, तर तिचे काम झाले की स्वच्छ धुऊन वाळवून पुढच्या खरेदीकरिता ती विशिष्ट जागी ठेवली जाते.. अशा आशयाचा तो मजकूर होता.  अस्सल मत्स्यप्रेमी घरातून आल्यामुळे मला हे विधान पूर्णपणे पटले. नॉनव्हेज, (हा एक अत्यंत शिष्ट शब्द आहे) जे हल्ली काळ्या पिशव्यातून आणले जाते त्याच्या अनेक वर्ष आधी तमाम मालवणी, सारस्वत, सीकेपी असे लोक अशीच पिशवी घेऊन रविवारी सकाळी मासळी बाजाराच्या दिशेने कूच करायचे.. तेव्हापासून ते आत्ता सुपर मार्केटमध्ये मिळणाऱ्या प्लास्टिक रॅपमधल्या कट फिशपर्यंत बराच प्रवास झालेला आहे, माशांचा..

anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Loksatta chaurang Isolation due to the person uniqueness or perceived inferiority
‘एका’ मनात होती..!: शिक्का.. लादून घेतलेला!
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!
madhya pradesh high court marathi news, live in relationship marathi news
लिव्ह-इन हे कायद्याने शक्य आहे म्हणजे व्यवहार्य आहेच असे नाही… मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे निरीक्षण

मासे खरेदी हा वाटतो तसा सोपा प्रकार नाही. तेव्हा फक्त कोळी मामीने वा मावशीने सांगितलं म्हणून सुरमई ताजी आणि पापलेट फडफडीत निघायचेच असे नाही.. अवाच्या सवा भाव देऊन आणलेली मासळी शिळी निघालीय हे कळल्यावर घरात जे सुतकी वातावरण होते ते अनुभवायला त्याच घरात जन्म घ्यायला हवा. असो.. तर उत्तम मासा व्यवस्थित घासाघीस करून कसा घ्यायचा ही संथा वडील मुलाला द्यायचे. (तेव्हा फक्त अधिकांश पुरुषच का मासळी बाजारात जायचे हे मला आजही न उकललेले कोडे आहे) आणि ती प्रथा पुढे चालायची. कोळी विक्रेते पण ठरलेले असायचे. चुकून जर ठरलेल्या मामी वा मावशीकडून मासे घेतले नाहीत तर खच्चून भरलेल्या बाजारात नावासकट उद्धार व्हायचा. माझ्या भावाला एका मामीने चारचौघांत ‘बापासारखा नय तू.. लय चिक्कू रे’ असे सुनावून पाणउतारा केलेला मी ऐकला आहे.

सांगायचा मुद्दा हा की मासे खरेदी एक वेगळी संस्कृती होती. हाताशी भरपूर वेळ ठेवून हे काम केले जायचे. आणि ते तसेच पुढील पिढी पार पाडायची. पण हळूहळू सगळ्यात बदल झाला. ‘झे झे ताजा म्हावरा..’ म्हणून मोकळ्या गळ्याने साद घालणाऱ्या आणि नेहमीच्या गिऱ्हाईकाला चार कोलंबी जास्त ढकलणाऱ्या प्रेमळ कोळी मावश्या, माम्या आणि मामा हळूहळू  कमी होत चालले आणि त्याची जागा प्लास्टिकचा निळा टब टाळक्यावर घेऊन ‘मच्छी ले लो’ म्हणून फिरणाऱ्या उत्तर भारतीय मंडळींनी घेतली. अर्थात काही ठिकाणी आजही हा व्यवसाय पारंपरिकच आहे, पण बदललाय मात्र आमूलाग्र..

बदलाचे एक मुख्य कारण म्हणजे घाईचे जीवन. रोजचे १२ तास बाहेर असणाऱ्या नोकरदारांना सुट्टीच्या दिवशी म्हणा किंवा  इतर दिवशी मासळी बाजारात जाणे इच्छा असूनही जमेनासे झाले. पुन्हा यात एकटे राहणारे किंवा अनुभव नसलेले, विद्यार्थी, तरुण असे अनेक आहेत. ज्यांना मासे घेणे जमत नाही. इच्छा असली तरी, एकतर ताजे मासे ओळखता येत नाहीत आणि दुसरे म्हणजे वेळ नाही. आणि जवळ नाही. समाजातील याच बदललेल्या गरजेला ओळखून सध्या ऑनलाइन मासे विक्री किंवा चक्क फोन करून घरपोच मासे डिलिव्हरी सेवा सुरू झालेल्या आढळतील. किराणा, भाजीपाला, औषधे, जेवणे, ऑनलाइन किंवा फोन करून मागवणे जसे नवे राहिलेले नाही तसेच हेसुद्धा.

आजघडीला मुंबईत / पुण्यात अशी सेवा पुरवणारे अनेक आहेत आणि कौतुकास्पद म्हणजे काही परंपरागत कोळी व्यवसायाची पाश्र्वभूमी असलेले आहेत तर काही चक्क फॉरेन र्टिन उच्चविद्याविभूषित हायटेक! नव्या मुंबईतील ‘ब्यू कॅच’ हा व्यवसाय सांभाळणारा गणेश नाखवा हे एक उदाहरण. पाच वर्षे ब्रिटनमध्ये राहून आल्यावर काहीतरी वेगळे करायचे म्हणून घरच्या पारंपरिक मासेमारी व्यवसायाला गणेशने ‘ब्ल्यू कॅच’ नाव देऊन ‘फिश होम डिलिवरी सíव्हस’ सुरू केली. घरचा धंदा असल्याने खाचाखोचा अवगत होत्याच. त्याला गणेशने कॉर्पोरेट लुक दिला आणि ‘ब्ल्यू कॅच’ उदयाला आली. फोनवरून गिऱ्हाईकाने ऑर्डर दिली की मागणीबरहुकूम व्यवस्थित कापलेले, स्वच्छ केलेले मासे इन्सुलेटेड पॅकिंगमधून गिऱ्हाईकांच्या दारात हजर.. पापलेट, सुरमई, रावस, वेगवेगळ्या आकाराची कोलंबी, लॉब्स्टर्स, खेकडे इतकंच काय पण िशपल्यासुद्धा ‘ब्ल्यू कॅच’ घरपोच देते. तेसुद्धा माफक किमतीत.

‘हलाल बॉक्स’ या फर्मचा शादाब इन्व्हेस्टमेंट बँकिंग सोडून या व्यवसायात शिरला तोच काही वेगळे करायच्या उर्मीने, सध्या प्रभादेवी ते अंधेरी या भागात शादाब मासे पुरवितो. मागणी केल्यावर साधारण दीड तासात हवा असलेला मासा, हव्या तशा आकारात कापून स्वच्छ करून गिऱ्हाईकाकडे पोचता होतो. वर्षांभरापूर्वी हाताच्या बोटांवर मोजता येणारे ग्राहक आता हजारावर गेलेले आहेत. आणि मुख्य म्हणजे कायमस्वरूपी आहेत. रोज साधारण ५० ते ८० ऑर्डर्सची डिलिव्हरी ‘हलाल बॉक्स’ करते. फक्त समुद्रातील नव्हे तर गोडय़ा पाण्याच्या रोहू, कटला, इलिश अशा माशांना मुंबईत खूप मागणी आहे. इलिश हा मासा साधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबरच्या सुमारास काही काळच मिळतो आणि त्या मोसमात तो खाल्ला नाही तर अनेक बंगाल्यांचा जीव वर्षभर हळहळत राहतो. असे रसिक, दर्दी खवय्ये शादाबवर विसंबून निर्धास्त असतात. चकचकीत चंदेरी रंगाचा ताजा इलिश शादाब हमखास पुरवतोच.

पुण्यातले चोखदंळ, चिकित्सक मासेखाऊ माशांसाठी विशाल दुग्रेवर अवलंबून आहेत. ‘फिश फॅनॅटिक्स’ ही त्याची आणि प्रसाद जोगची कंपनी पुणेकरांना ताजी चविष्ट मासळी पुरवत आहे. विशालने ठरवून फिशरीजमध्ये शिक्षण घेतले. आणि हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या प्रसादबरोबर हा व्यवसाय सुरू केला. त्याच्या मते, सध्याच्या ग्राहकाचा चेहरा पालटतोय. मासळी बाजारात जाणे जमतेच असे नाही आणि जमले तरी व्यवस्थित फसवणूक न होता मासा मिळेलच याची हमी नाही. अशा ग्राहकांना अशी ऑनलाइन / डायल डिलिव्हरी सेवा खूप  सोयीची पडते. पुण्यातील मत्सप्रेमी ‘फिश फॅनॅटिक्स’चे चाहते झालेले आहेत. इतके की विशालला नुसता फोन केला तरी ग्राहकाला त्याची मागणी काय आहे ते नव्याने सांगावे लागत नाही.

‘‘मासे विक्रीत महत्त्वाची असते ती स्वच्छता,’’ असे ‘सागर फिश’च्या सरफराजने आवर्जून नमूद केले. मासे अत्यंत नाशिवंत असल्याने त्याला हाताळताना तशीच काळजी घ्यावी लागते. केमिकल इंजिनीअर असलेल्या सरफराजच्या ‘सागर फिश’ची डिलिव्हरी फक्त मुंबईत नव्हे तर पार मध्य प्रदेश, राजस्थान येथपर्यंत जाते आणि त्याचे बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी क्लायंटपण आहेत. ज्यांच्या घरच्या पाटर्य़ा, मेजवान्या ‘सागर फिश’च्या मासळीशिवाय पार पडत नाहीत. सरफराजच्या मते हल्ली ग्राहक अत्यंत चोखंदळ झालाय. तो चार पैसे जास्त देईल पण त्याला तशी क्वालिटी हवी हे खरे.! हल्ली पूर्वीसारखे पारंपरिक रीतीने कापलेल्या माश्यांऐवजी गिऱ्हाईकाने वेगवेगळ्या तऱ्हेने कट दिलेले मासे हवे असतात. जसे की फिलेज, बटरफ्लाय प्रॉन्स्, कवचाला कट दिलेला लॉबस्टर अशी निवडक मागणी या सेवांकडून पुरवली जाते.

या सर्वाच्या मते, या धंद्यात अत्यंत महत्त्वाचे आहे ते लॉजिस्टिक. ससून डॉक, भाऊचा धक्का अथवा मोरा बंदर कुठूनही आलेली मासळी किमान १० तास आधी  पाठवलेली असते. त्यामुळे खराब होण्याआधी तातडीने डिलिव्हरी करणे. ते पण साफसफाई करून, हे कळीचे ठरते. पण हे गणित या सर्वाना चांगले जमले आहे हे त्यांच्या वाढणाऱ्या ग्राहकसंख्येवरून जाणवते.

हे झाले मोठे फिश डिलिव्हरीवाले पण हल्ली पारंपरिक कोळी माम्या पण चक्क व्हॉट्स अ‍ॅपवरून ऑर्डर घेतात आणि पुरवतात. बेलापूरच्या अनिता कोळीने तिचा घरोघरी जाऊन मासे विकायचा व्यवसाय पंधरा वर्षांपासून बंद केला आहे. पण गेले काही महिने ती फोनवरून ऑर्डर घेते आणि साधारण तास-दोन तासांत मासळी सांगितल्याबरहुकूम गिऱ्हाईकाच्या घरी पोहोचवते. शिवाय ती मासळी शिजवायची कशी याच्या खास टिप्सही देते. शनिवार, रविवार किंवा पार्टी समारंभावेळी जेव्हा खूप ऑर्डर असतात, तेव्हा मदतीला लेक धनश्री आणि भाऊ राजेश शर्मा येतो. खाडीची ताजी कोलंबी साफ करून, पापलेटचे पातळ काप घेता घेता, तिचे फोनवर ऑर्डर घेणे चालू असते. आता बाजारात जाऊन घेतलेल्या मासळीपेक्षा येथे थोडे पैसे जास्त पडतात, पण जायचा यायचा वेळ, श्रम, याचा विचार करता गिऱ्हाईक घरपोच डिलिव्हरीला प्राधान्य देते. अनितासारखीच अविशा कोळी. दिवाळे गावात तिचा मासे विक्रीचा व्यवसाय आहेच. पण तीसुद्धा फोनवरून ऑर्डर घेऊन त्या पुऱ्या करते. फक्त बेलापूर नव्हे तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथे अनेकजण अशा प्रकारे व्यवसाय करताना आढळतील. ठाण्याच्या एका कोळी मामाच्या मते सध्या मुख्य शहरापासून लांब लांब अनेक सोसायटय़ा झाल्यात ज्यांना मुख्य मार्केट लांब पडते. असे लोक मग आठवडा-पंधरा दिवसांचा बाजार एकदाच ऑर्डर करून फ्रिजमध्ये ठेवतात. नेहमीचे गिऱ्हाईक असल्याने फसवणूकही होत नाही. गणेश नाखवाच्या आणि विशाल दुग्रेच्या

मते, या व्यवसायात माऊथ पब्लिसिटी अत्यंत महत्त्वाची असते. त्या दोघांची ग्राहकसंख्या अशीच वाढलेली आहे.

या व्यवसायात आता आणखीन एक भर पडलीय म्हणजे मासे फक्त साफसूफ करून नाही तर, त्यांना वेगवेगळे मसाले लावून, मॅरिनेट करून ग्राहकाला पाठवले जातात, काही जणांचे ठरलेले मसाले आहेत, जसे की कोलंबी कोळीवाडा मसाला, रावस, चिली, भरले पापलेट, तर काही ऑर्डरप्रमाणे मसाले लावून मुरवून देतात, अनिताचे अनेक ग्राहक तिलाच सांगतात की, अस्सल कोळी मसाला लावून मॅरिनेट करून दे, तिची कोळी मसाला सुरमई अनेकांना आवडते, घरी फक्त तळायचे एवढेच काम राहते.

गणेश नाखवाच्या मनात हे सुरू करायचे आहे, कारण तशी पृच्छा केली गेलेली आहे. त्या दृष्टीने  त्याच्या योजनासुद्धा आहेत. थोडक्यात ग्राहकवर्गाचा बदलणारा तोंडवळा यामधून दिसतो, हा पारंपरिक व्यवसाय नुसता आधुनिक होत नाहीये तर संपूर्णपणे ग्राहक केंद्री  होण्याच्या मार्गावर आहे.

पारंपरिक मासे विक्रेत्याचे हे हायटेक रूप नक्कीच आकर्षक आणि आधुनिक आहे. यात दुमत नाही. फक्त मुंबई, पुणे नव्हे तर दिल्ली, चेन्नई, कोलकाता अशा शहरांत अनेक ऑनलाइन मासे विक्रेते आढळून येतील. काही वर्षांपूर्वीच्या त्या पारंपरिक निळ्या / खाकी पिशवीची जागा इन्सुलेटेड बॉक्सने घेतलीय आणि गळाभर दागिने, ठसठशीत कुंकू लावलेल्या मामीच्या जागी युनिफॉर्ममधील डिलिव्हरी मॅन आलाय. अर्थात आजही मासळी बाजारात स्वत: जाऊन मनमोकळी, घासाघीस करून मनाजोगी मासळी जगज्जेत्या सिकंदराच्या आविर्भावात घेऊन येणारे अनेक आहेत. पण कदाचित त्यांची पुढची पिढी घरबसल्या कोक ढोसत एका कळीसरशी चार पापलेट आणि १ किलो कोळंबीची ऑर्डर देईलही. कोण जाणे.! ताटात पडणारी चुरचुरीत भाजलेली खमंग तुकडी महत्त्वाची!

शुभा प्रभू साटम shubhaprabhusatam@gmail.com