मुंबईची आपली अशी अस्सल खाद्यसंस्कृती आहे. शिवाजी पार्क दादरचे ‘आस्वाद’, ‘प्रकाश’ महाराष्ट्रीय संस्कृती दाखविते. जिमी बॉय, ब्रिटानिया कयानीमधून पारशी लोकांना समजून घेता येऊ शकते. ‘जय हिंद’मधून भंडारी मांसाहारी जेवण उलगडते. चौपाटीचे ‘क्रिस्टल’, बोरीबंदरचा ‘पंचम पुरीवाला’, जुहूचे अस्सल अनामिक भेळपुरीवाले, खाऊगल्लीतली पावभाजी, तवा पुलाव, मोहम्मद अली रोडवरचे लाकडी पॉटमधील आइस्क्रीम, बादशहाचा कुल्फी फालुदा, बडेमियाचे कबाब, इराण्याचा चहा.. खूप काही, पण ते सगळं दाखवणारा, खिलवणारा कोणी तरी गाईड हवाच, त्यासाठीच आपल्याकडेही फूड वॉक, फूड टूर, फूड शेर्पाची संकल्पना रुजत चालली आहे. मुंबईतल्या या फूड वॉक्स आणि टूर्स बरोबरची ही खाद्यसफर..

प्रत्येक शहराची आपली अशी एक खास पहचान असते, संस्कृती असते आणि ती त्या त्या शहराच्या कानाकोपऱ्यांतून जाणवत राहते. ऐतिहासिक वारसा, निसर्ग, वास्तुकला, शिल्प, मंदिरे, भौगोलिक वैशिष्टय़े या सर्वाचा मिळून एक पर्यटन आराखडा बनतो, मात्र त्या त्या परिसराची खरी संस्कृती उलगडली जाते, स्थानिक लोकजीवनातून आणि तिथल्या खाद्यसंस्कृतीतून. म्हणजे समजा चेन्नईला गेलात तर तिथली पर्यटन स्थळे बघताना आणि रेशमी साडय़ांची खरेदी करताना वनयार्ड कॉफी घेतली नाही किंवा रेशमी साडीसारखाच अलवार पोत असलेली इडली रसरशीत चटणीसोबत गट्ट केली नाही किंवा कोलकात्याला जाऊन नाक-डोळे गाळत ठसकत ‘पुचका’ फस्त केला नाही, डेहराडूनला जाऊन ‘बाल की मिठाई’ची चव घेतली नाही, अमृतसरचे ‘छोले कुलचे’ खाल्ले नाहीत, तर मग तुम्ही खरं पर्यटन, संस्कृती अनुभवलीच नाही.

आणि ती खाद्यसंस्कृती अनुभवायची असेल तर तसाच जाणकार लागतो. टूर गाईड असतो तसाच एक प्रकार सध्या प्रसिद्ध पावतोय, फूड गाईड किंवा फूड टुर किंवा फूड शेर्पा. खरं तर भारतात पर्यटन हे गंभीरपणे घेतले जाऊ लागले आहे ते  गेल्या दहा-पंधरा वर्षांत! त्याआधी पर्यटन म्हणजे स्थळांची जंत्री असायची. फक्त काही ठरावीक ठिकाणं पाहिली की झालं; पण आता पर्यटनही खूप बदलत चाललं आहे. आता त्या त्या प्रांतातली फक्त खाद्यपदार्थाची चव चाखण्यासाठी खास सहली आयोजित केल्या जातात.

भारतीय पर्यटक जेवढे नसतील तेवढे पाश्चात्त्य पर्यटक याबाबतीत अत्यंत चोखंदळ असतात आणि यायच्या आधी त्यांचा त्या त्या ठिकाणचा अभ्यास दांडगा असतो, ज्यात खाणेपिणे महत्त्वाचे असते. परदेशातील अनेक पर्यटक त्यासाठी खास दिवस राखून ठेवतात. सध्या मुंबईत ज्या फूड टुर्स किंवा वॉक्स निघत आहेत त्यामागे हे मुख्य कारण आहे, असे कल्याण कर्मकार या फूड गाईडने आवर्जून सांगितले. परदेशाच्या तुलनेत आपल्याकडे फूड वॉक्स किंवा फूड टुर्स उशिरा सुरू झाल्या. कल्याणचा फूड ब्लॉग वाचून अनेक जण त्याच्याशी संपर्क करू लागले, त्याची मते विचारू लागले आणि त्यातून कल्याणला फूड वॉकची कल्पना सुचली. २०१२ पासून कल्याण मुंबईच्या वेगवेगळ्या भागांत फूड वॉक/फूड टुर आयोजित करत आहे.

या फूड टुर किंवा फूड वॉक म्हणजे नक्की काय असते? तर ते म्हणजे फक्त प्रसिद्ध पदार्थ खाणे नाही, तर त्यामागचा इतिहास जाणून घेणे. म्हणजे समजा, मुंबईच्या दादर भागात फिरत आहात तर महाराष्ट्रीय संस्कृती म्हणजे काय आणि मुंबईची ‘सिग्नेनेचर डिश’ असणारा वडापाव येथून कसा उदय पावला हे जाणून घेणे असते. ‘प्रकाश’मध्ये फक्त मिसळ खाल्ली किंवा साबुदाणा खिचडी, मठ्ठा फस्त केला म्हणजे संपूर्ण मुंबई खाद्यसंस्कृती कळणार नाही. त्याकरिता मुंबईच्या खास मानल्या गेलेल्या अनेक गोष्टी खायलाच हव्यात, हे यतीन पाठक या फूड गाईडचे मत. ‘फूड टुर्स ऑफ मुंबई एल.एल.पी.’ ही त्याची कंपनी गेली ४ ते ५ वर्षे फूड टुर/वॉक्स आयोजित करत आहे. यतीनच्या दोन फूड टुर्स आहेत. एक ‘फोर्ट फूड टुर’ आणि ‘स्ट्रीट फूड टुर’ ज्यात फोर्ट भागातील हेरिटेज वास्तू आणि खाण्याची प्रसिद्ध ठिकाणे यांची सांगड घातली जाते. ‘स्ट्रीट फूड टुर’मध्ये मुंबईची प्रसिद्ध पावभाजी, बर्फाचा गोळा, जुहू बीच-चौपाटीवरची भेळ, पान, वडापाव हे समाविष्ट केले जाते.

येथे येणाऱ्या पर्यटकांना फक्त हे पदार्थ खायला घालणे हा हेतू नसतो, तर ते ते पदार्थ का लोकप्रिय झाले? केव्हापासून अस्तित्वात आहेत? ते केले कसे जातात हे हसतखेळत अनौपचारिक पद्धतीने सांगता येणे हा फूड वॉकमधला महत्त्वाचा घटक, हा कल्याणचा अनुभव. कल्याण त्याच्या पाहुण्यांना मोठमोठय़ा रेस्टॉरंटमध्ये फार क्वचित नेतो. तुलनेने छोटी हॉटेल्स किंवा फारशी प्रसिद्ध नसलेली ठिकाणे त्याच्या यादीत असतात आणि याकरिता त्याला सतत सजग राहावे लागते. आपल्याकडे कोणते पर्यटक आहेत आणि त्यांची आवडनिवड फर्माईश काय आहे याची नीट सांगड घालावी लागते. त्यांना फक्त खायला घातले की काम झाले असे फूड टुरमध्ये होत नाही. यतीनच्या मते अशा टुरवर जो गाईड असतो त्याला सखोल माहिती असायला हवी. ‘फोर्ट फूड टुर’ करताना तिथल्या प्रसिद्ध इमारती आणि रेस्टॉरंट दाखविताना ती तिथे का आली? कधी आली? हेपण सांगणे आवश्यक असते. इराणी म्हणजे काय? त्यांचा मुंबईच्या सांस्कृतिक राजकीय जीवनात काय हिस्सा होता? अनेक उगवत्या कलाकारांना, लेखकांना, राजकारण्यांना या इराण्यांनी त्यांच्या उमेदवारीच्या काळात कसा आधार दिला हे सांगणे गरजेचे असते. म्हणजे आपण ज्या ठिकाणी आत्ता आहोत तेथे कोणे एके काळी किशोरकुमार यायचा. लतादीदीची आवडती डिश ही अमुक होती यांसारख्या ‘अ‍ॅडिशन्स’ त्या त्या ठिकाणचं कुतूहल निर्माण करतं.

बॅलॉर्ड इस्टेटमधील ब्रिटानियाचा बेरी पुलाव नक्की काय आहे? जिमी बॉयचा धानसाक आणि चिकन फारचा हा अस्सल पारशी कसा? ‘आस्वाद’ची मिसळ आणि ‘प्रकाश’ची खिचडी यांच्यात फरक काय? हे त्या गाईडला व्यवस्थित माहीत असायला हवे, असे कल्याणचे मत आहे. कल्याण स्वत: अत्यंत उत्तम आणि चोखंदळ खवय्या असल्याने खाणे प्रांतात त्याची बऱ्यापकी मुशाफिरी झालेली आहे. मालवणी मासे वेगळे आणि बंगाली वेगळे कसे हे तो पर्यटकांना व्यवस्थित समजावून देऊ शकतो, तोही माशाचा काटा घशात न अडकवता.

‘‘मुंबईचा फूड मॅप किंवा खाद्यनकाशा खूप मोठा आहे,’’ आकाश सांगतो. आकाश हाही फूड गाईड आहे. ‘सीक शेर्पा’ हे त्याच्या फूड टुरचे नाव. हिमालयात जसे शेर्पा वाटाडे असतात तसा हा फूड शेर्पा. ‘डेंजरस डायिनग अ‍ॅट डोंगरी’ ही त्यांची फूड टूर खूप लोकप्रिय आहे. मुंबईच्या स्ट्रीट फूडमधली मसालेदार गल्ली या टुरमधून उलगडते. डोंगरी, नागपाडा, मोहमद अली रोड या भागांतील कबाब, बिर्याणी, तंदुरी, बोहोरी जेवण, बारा हंडी खाना आणि मुंबईतील सर्वात जुने आइस्क्रीमचे दुकान या टुरमध्ये समाविष्ट आहे. रमजानच्या काळात तर या टुरला खूप मागणी असते. पंचतारांकित किंवा दुसऱ्या एखाद्या पॉश रेस्टॉरंटमधील कबाब, बिर्याणी आणि या टुरमध्ये मिळणारी अस्सल मुस्लीम पद्धतीने तयार केलेली बिर्याणी नक्कीच वेगळी ठरते. आपल्यासमोर लालबुंद कोळशावर खरपूस भाजले जाणारे कबाब आणि या गल्लीला ‘बारा हंडी मोहल्ला’ हे नाव का पडले हे पुदिना चटणीसोबत कबाब फस्त करत ऐकण्याची मजा वेगळीच आहे.

कल्याणचे मत आहे की, खाणे-पिणे आणि त्याबद्दल बोलणे हे माणसांना एकत्र आणते. खाणे हे एकटय़ाने करण्याची गोष्ट नाही. ते उरकणे झाले. बंगाली माझेर झोल आणि भात खाल्ल्यावर त्यांची सांगता फक्त ‘कलकत्ता मीठा पान’ने का करायची हे जाणकार फूड गाईडच सांगू शकतो आणि पारशी जेवणानंतर फक्त पालनजींचे रासबेरी ड्रिंक का घ्यावे हे समजावून द्यायला तसाच दर्दी खवय्या असावा लागतो.

इतिहास म्हणजे जसं फक्त घटना- प्रसंगाची जंत्री नव्हे तसेच पर्यटनातील खाणे-पिणे हे ऐकण्याची बाब नव्हे, असे मत मुंबई ‘मोमेंटस’ या फूड टुरच्या आमिश शेठ यांनी व्यक्त केले. त्यांच्या फूड टुर्स १०० टक्के शाकाहारी असतात. कुलाबा भागात आणि आजूबाजूच्या ठिकाणची पावभाजी, भेळ, पाणीपुरी, पान, फालुदा असे पदार्थ या टुरमध्ये देशीपरदेशी पर्यटकांना खिलवले जातात.

या फूड टुपर्यंत पोहोचायचे कसे? किंवा त्यांची माहिती कशी मिळते? बुक माय शो, वेबसाइट्स, ट्रिप अ‍ॅडवायझर अशा संकेतस्थळांवर अशा टुर्सची माहिती उपलब्ध असते. या टुर्स साधारणपणे दोन ते तीन तास चालतात. एका ठरावीक ठिकाणी सगळे जमा होतात, परिचय होतो आणि मग सुरू होते, एक चविष्ट खाद्ययात्रा!

यतीनच्या मते टुरमध्ये खूप टुरिस्ट/पर्यटक असणे योग्य नाही. त्यामुळे प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देता येत नाही. कमी लोक असल्यावर एक घरगुती वातावरण तयार होतं आणि आपल्यालाही त्याचा वेगळा आनंद मिळतो. फूड टुर्स परदेशात फार प्रचलित आहेत. एखाद्या शहराचा इतिहास जसा त्यामधील इमारती, प्रेक्षणीय स्थळे यांच्यातून प्रतििबबित होतो. तसाच तो तिथल्या खाद्यजीवनातही उमटतो. म्हणूनच जेवण आणि पर्यटन एकत्रित ही एक नवी संकल्पना उदयाला आली आहे. न्यूयॉर्कमध्ये जाऊन सेंट्रल पार्क, म्युझियम बघतानाच तेथले बोडेगा (एक प्रकारचा इराणीच) किंवा रस्त्यावरचे हॅमबर्गर स्टॉल्स, फूट ट्रक्स पाहणे. इटलीमध्ये अस्सल पिझ्झा चाखणे, पास्ता कसा होतात तो पाहाणे, स्पेनमध्ये सांगरीया स्वत: करून पाहणे. फ्रँकफ्रूटमध्ये अस्सल जर्मन बीअरच्या ब्युअरीला भेट देणे, अशा अनोख्या बाजू फूड टुरमध्ये येतात. ‘फूड टुर्स ऑफ मुंबई एल.एल.एम.’च्या देविका कुलकर्णी हिच्या मते भारतात ही संकल्पना हल्ली रुजलेली आहे. थँक्स टू सोशल मीडिया. मुंबईत चाखलेला पदार्थ थेट अलास्कापर्यंत जातो, तोही झटपट. टुरसाठी ठिकाणे शोधता कशी, याच्यावर तिचे म्हणणे की, त्यासाठी प्रत्यक्ष पायपीट करावी लागते आणि मुख्य म्हणजे गाईडला त्यातले पूर्ण ज्ञान असावे लागते. एखादे ठिकाण फक्त प्रसिद्ध आहे म्हणजेच चांगले असेलच असे नाही. त्यासाठी कमी प्रसिद्ध, पण अस्सल आणि ऑथेंटिक ठिकाणं निवडावी लागतात.

पर्यटनाला आता नवनवीन दिशा मिळताहेत आणि अशा फूड टुर त्यामध्ये अग्रिम आहेत. मुंबईची आपली अशी अस्सल खाद्यसंस्कृती आहे. मरिन लाइन्समधील अनेक लहान लहान हॉटेल्समधून येणारा पोर्कचा दरवळ जो गोवन कॅथलिक समाजजीवन सांगतो. शिवाजी पार्क दादरचे ‘आस्वाद’, ‘प्रकाश’ जे महाराष्ट्रीय संस्कृती दाखविते. जिमी बॉय, ब्रिटानिया कयानीमधून पारशी लोकांना समजून घेता येऊ शकते. ‘जय हिंद’मधून भंडारी मांसाहारी जेवण उलगडते. चौपाटीचे ‘क्रिस्टल’, बोरीबंदरचा ‘पंचम पुरीवाला’, जुहूचे अनेक अस्सल अनामिक भेळपुरीवाले, खाऊगल्लीतली पावभाजी, तवा पुलाव, मोहम्मद अली रोडवरचे लाकडी पॉटमधील आइस्क्रीम, बादशहाचा कुल्फी फालुदा, बडेमियाचे कबाब, इराण्याचा चहा, काळबादेवी भुलेश्वर येथे असणारी अनेक छोटीमोठी शाकाहारी जेवणाची ठिकाणे, सुरतीचा उधियो, नृसिंह लॉजची थाळी, ताडदेवच्या स्वाती स्नॅकची पानकी, फाडा खिचडी, माटुंग्याच्या कुलरकडचा इराणी बनमस्का, शारदा भुवनची ब्राह्मणी इडली आणि रवा केसरी. सायन कोळीवाडय़ातली पंजाबी मच्छी फ्राय आणि तंदुरी चिकन अशा असंख्य अनेक जागा आहेत ज्या आपले वेगळेपण टिकवून आहेत.

येथे जेवण एक इतिहास म्हणून येतं. कुठल्याही जातिवंत खवय्याला नुसते उदरभरण न करता त्यामागची संस्कृती जाणून घ्यायची असते. म्हणूनच कल्याण बटाटापुरी आणि साबुदाणा वडा यातला फरक एखाद्या दिल्लीकराला वा स्पॅनिश माणसाला व्यवस्थित समजावून सांगू शकतो. मिसळ आणि उसळ कशा वेगळय़ा आहेत. एकीसोबत पाव आणि दुसरी सोबत पोळी का, हे आणि ब्रून मस्का व मस्का पाव वेगवेगळे कसे आणि का हे चेन्नईच्या अय्यर यांना यतिन उलगडून सांगतो तेव्हा त्यांना ते व्यवस्थित समजते. तेव्हा आपण म्हणू शकतो की, मुंबईची चव त्यांना कळली.

चालता चालता सहज जिव्हासुख देणारी असंख्य ठिकाणे येथे आहेत आणि या फूड वॉक्स/टुरमुळे ती पर्यटन नकाशावर येत आहेत. अशाच लज्जतदार यात्रा अनेक दर्दी खवय्यांना सतत घडत राहोत आणि तृप्तीचा ढेकर येऊन त्याचा फूड वॉक सुफळ संपूर्ण होवो, ही इच्छा!

शुभा प्रभू साटम shubhaprabhusatam@gmail.com