आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा प्रयत्न.

शेफ मंडळींच्या तोंडून एक वाक्य आपण आवर्जून ऐकतो. पदार्थ पहिले डोळ्यांनी चाखला जातो. जीभ त्यानंतर स्वाद घेते. ज्या पदार्थाच्या दर्शनाने डोळे निवतात पण जीभ मात्र त्याचा आस्वाद घ्यायला आतुरते, असा पदार्थ म्हणजे फालुदा. बऱ्याचदा एखाद्या पदार्थात इतके सारे घटक मिसळलेले असतात की, तो पदार्थ नेमका कशापासून बनलाय हे अनेक र्वष कळतच नाही. लहानपणी फालुदा समोर आला की, त्यातल्या समाविष्ट सगळ्या घटकांची गोळाबेरीज चवीला छान लागते एवढंच काय ते कळायचं. पण मग हळूहळू त्यातल्या त्या लांबच लांब शेवया, सब्जा, जेली यांची अलग अलग चव एकत्रित करून चाखण्याचा छंद लागतो.

Mahindra XUV 3X0 bookings open
महिंद्राच्या नव्या SUV कारला देशातील बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच मोठी मागणी; बुकींग सुरु, पाहा किती मोजावे लागणार पैसे
Katchatheevu Island
पोर्तुगीजांकडून ब्रिटिशांकडे, ब्रिटिशांकडून भारताकडे, भारताकडून श्रीलंकेकडे… कचाथीवू बेटाचा वादग्रस्त प्रवास!
india-pakistan
विश्लेषण : भारत-पाकिस्तान व्यापार पाच वर्षांनी सुरू होणार? जाणून घ्या तेव्हा व्यापार ठप्प होण्याची काय होती कारणं?
saraswati River civilization,
यूपीएससी सूत्र : भारतातील प्राचीन सरस्वती-घग्गर संस्कृती अन् पाकिस्तानच्या बंदरात चीनचं गुप्तहेर जहाज, वाचा सविस्तर..

फालुदा मूळचा पर्शियन. तिथे फालुदेह नावाने तो ओळखला जायचा. मुस्लीम राजवटीसह फालुद्याने भारतात आगमन केलं. मात्र हा पदार्थ सुरुवातीच्या काळात केवळ मुस्लीम राजघराण्यांशीच जोडलेला होता. सर्वसामान्य माणसापर्यंत तो पोहोचायला मध्ये बराच काळ जावा लागला. मुघल राज्यकर्त्यांपैकी जहाँगीर त्याच्या खवय्येगिरीसाठी प्रसिद्ध आहे. उकडलेल्या गव्हाच्या शेवया, फळांचा रस आणि मलईमिश्रित असा फालुदा त्याचं आवडतं डेझर्ट होतं असं म्हणतात. फालुदा त्या काळातही थंड पदार्थच होता. हिवाळ्यात हिमालयातील बर्फ गच्चबंद लाकडी खोक्यातून मागवून तो जमिनीच्या आत वा तळघरात ठेवून पदार्थाला, फळांच्या रसाला थंडावा दिला जायचा. त्याच पद्धतीने फालुदादेखील गारेगार असे. मात्र मुस्लीम राजघराण्याचं हे आवडतं डेझर्ट काळाच्या ओघात आम झालं.

काही पदार्थाच्या कृतीतच त्या पदार्थाला काळानुरूप बदलत नेण्याची शक्यता दडलेली असते. फालुदाच्या बाबतीतही नेमकं हेच झालं. मूळच्या गव्हाच्या शेवया, सब्जा, दूध तसेच राहिलं. हळूहळू काळाप्रमाणे फालुदा मात्र याच घटकात नवनव्या गोष्टी वाढवत गेला. दुधासोबत आइस्क्रीम आलं, जेली आली, काही वेळा कुल्फीचा प्रकार अजमावून पाहिला गेला. शाही घराण्याशी जोडला गेल्याने सुकामेव्याची पखरण तर पूर्वापारपासून होतीच. पण त्याला चोकोचिप्स किंवा वॉफल्सचीही (हंऋऋ’ी२) साथ मिळू लागली.

फालुद्याच्या पारंपरिक प्रकारात रोझ, केशर यांचा वापर अधिकतर असतो. रॉयल फालुदा या शब्दाचा अर्थ, त्याचे सुरुवातीचे राजघराण्याशी असलेले ऋणानुबंध स्पष्ट करतात. काही फालुद्यात गव्हाच्या शेवयांऐवजी फळांचे तुकडे वापरले जातात. जगभरात फालुदा प्रसिद्ध आहे. मात्र तो वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. फिलिपाईन्स मंडळींच्या पारंपरिक डेझर्टची कृती फालुद्यासारखीच आहे. पण नाव आहे ‘हालो हालो’. मलेशिया, सिंगापूर येथे फालुद्यासारख्या पदार्थाला ‘बांडुंग’ म्हटलं जातं.

फालुदा हा शब्द आपल्या बोलीभाषेतही आपण वापरतो. इज्जतीचा फालुदा झाला हा वाक्प्रयोग कानावर पडला की अनेकदा मनात यायचं की, इतक्या गोड आकर्षक पदार्थाला ते इज्जतीशी जोडण्याचं कारण काय असावं बुवा? तर फालुद्यामधल्या शेवयांसारखी इज्जत, अब्रू तुकडे तुकडे झाली या अर्थाने हा शब्दप्रयोग होतो.

उन्हाळा असो वा हिवाळा; फालुदा खायचा मूड झाला की बाहेरच्या ऋतूचा विचार क्षणात गायब होतो आणि मनात, ओठांवर एक छानसा गारवा पसरतो. पुढे फालुदा खायचाच या कल्पनेने जेवण आवरतं घेणारी मंडळी असतात. मिल्क शेक्स, आइस्क्रीम, ज्यूस यांच्यासाठी तुडुंब पोटभरणानंतरही जागा करता येते. फालुदा खाण्यासाठी ती करून द्यावी लागते. घरच्या घरी केलेला फालुदा असो वा हॉटेलमधला फालुदा- पण काचेच्या ग्लासातून वेगवेगळी रंगसंगती घेऊन जेव्हा तो समोर येतो तेव्हा त्या प्रत्येक थरात मन गुंतून राहतं. आइस्क्रीमवर लक्ष द्यावं की जेलीच्या तुकडय़ांवर डोळा ठेवावा याचं डोक्यात प्लॅनिंग सुरू होतं. खालचा रोझ किंवा केशराचा तळ ढवळल्यावर ती जेली, ते आइस्क्रीम, सब्जा, शेवया एकमेकांत मिसळून जो काही स्वाद देतात! केवळ अप्रतिम! लांबलचक शेवया चमच्याने खाण्याचं आणि बाकीचं मिश्रण स्ट्रॉने ओढण्याचं दिव्य पार पाडत फालुदा चाखताना आपण रंगून जातो. खाताना माझ्याकडे आणि फक्त माझ्याकडेच बघा असं सांगणारा हा फालुदा रात्रीची शतपावली किंवा उन्हाळ्यातील पायपीट सार्थकी लावतो. रूपाचा देखणेपणा, चवीतला गोडवा आणि अनुभवातला गारवा या तिन्ही कसोटय़ांवर पूर्ण उतरणारा फालुदा एकच गोष्ट सांगतो. गार खा! गार व्हा!