आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा प्रयत्न.

काही माणसांबद्दल आपल्याला दोन टोकाची मतं दिसतात. ‘किती कुल आहे’पासून ते ‘काय बकवास आहे’पर्यंत.. अशा भिन्न प्रतिक्रिया त्यांना सहज मिळतात. काही पदार्थाचंपण असंच असतं. ते विशिष्ट वयात खूप आवडतात, तर कालांतराने अगदी नकोसे वाटतात. अशा हवं-नकोच्या लंबकावर हेलकावणारा पदार्थ म्हणजे च्युइंगम. आपल्या बोलीभाषेतलं चिंगम. रोज खावा असा हा पदार्थ नाहीच. लहान वयात याची विशेष मोहिनी असते. च्युइंगम आवडण्याचा चवीशी फारसा संबंध नाही. चघळून चघळून सगळी च्युइंगम्स सारखीच लागतात. मग अनादी कालापासून हे च्युइंगम का आवडत आलं असावं?

Reptiles, tigers, Reptiles news, Reptiles latest news,
विश्लेषण : वाघांइतकेच सरपटणारे प्राणीदेखील महत्त्वाचे.. पण तरीही ते दुर्लक्षित का असतात?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
chaturgrahi yoga
५० वर्षांनंतर निर्माण होतोय ‘चतुर्ग्रही योग’! या राशींचे नशीब चमकणार, शुक्र अन्, बुधच्या कृपेने मिळेल पैसा, प्रगती अन् यश
Video Of Baby Turtles Making Their First Voyage Will Give You Goosebumps
Video : डायनासोरच्या काळापासून अस्तित्वात आहे ही कासवांची प्रजाती, चिमुकल्या कासवांचा पहिला समुद्र प्रवास एकदा बघाच

साधारण दहा हजार वर्षांपासून नैसर्गिक रूपात च्युइंगम अस्तित्वात आहे. प्राचीन काळी ग्रीसमध्ये पिवळसर रंगाचा विशिष्ट वृक्षाचा डिंक चवीने चघळला जायचा. त्यामुळे दात स्वच्छ होऊन मुखदरुगधी दूर व्हायची. स्त्रियांकडून त्याचा विशेष वापर होत असे. अमेरिकेतली रेड इंडियन मंडळी स्पृस झाडाच्या चिकापासून बनलेली राळ चघळत. सॅपोडीला नामक झाडापासून तयार डिंकसुद्धा गमसारखा चघळला जायचा. त्यामुळे तहानेची भावना व भूक नाहीशी होत असे. हे एकप्रकारे नैसर्गिक रूपातलं च्युइंगमच होतं. हजार वर्षांपासून त्याचा वापर तर होतंच होता. फक्त त्याला व्यावसायिक रूपात कुणी तरी आणण्याची गरज होती. सन १८४८ साली हे काम केलं जॉन बी कर्टिस यांनी. अमेरिकन इंडियन मंडळींची ही गमची आवड त्यांनी व्यावसायिक रूपात च्युइंगम म्हणून बाजारात आणली. मात्र त्या काळातलं हे च्युइंगम स्वादरहित होतं. १८६० मध्ये जॉन कॉलगन यांनी त्याला स्वाद दिला. फक्त मुले व कुमारिका यांना सार्वजनिकरीत्या च्युइंगम खायची अनुमती होती. दातांची बळकटी वा मुखवास याकरिता स्त्री-पुरुष एकांतात च्युइंगम खात. सार्वजनिक ठिकाणी ते निषिद्ध होतं.

या च्युइंगमला घराघरांत पोहोचवण्याचं कार्य अमेरिकेच्या विल्यम रिंग्ले ज्युनियर यांनी केलं. २०व्या शतकात अनेक उत्पादक च्युइंगम विकत होते. त्यात स्वत:चा खप वाढवण्यासाठी विल्यम यांनी समस्त फोनधारकांना मोफत च्युइंगम वाटलं होतं. अर्थात त्या काळात फोनधारकांची संख्या मर्यादित होती. इतकेच नाही तर मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसाला विल्यम यांच्याकडून च्युइंगमची भेट जात असे. पहिल्या वाढदिवसाला मुलाच्या दातांचं बोळकं असणार हे ध्यानात ठेवून विल्यम यांनी योग्य वयात मुलाच्या हातात च्युइंगम ठेवून उत्तम मार्केटिंग केलं. अशा प्रकारे जो तो आपल्या च्युइंगमचं उत्पादन वाढवत असताना खूपच स्पर्धा निर्माण झाली. त्यात कोणता वेगळेपणा आणता येईल याचा विचार सुरू असताना बबलगमचा जन्म झाला. १८८५ मध्ये फ्रँक फ्लीर याने चघळत्या गमचा मोठा फुगा काढणारे च्युइंगम तयार केले. हाच पहिला बबलगमचा प्रयोग. पण तो लोकांना फारसा रुचला नाही. पुढे फ्लीरकडेच काम करणाऱ्या वॉल्टर डाएमेरला अचूक फॉम्र्युला सापडला आणि त्यातून बबलगम खऱ्या अर्थाने लोकप्रिय झालं. या पहिल्या  बबलगमचं नाव होतं ‘डबल बबल’.

आज च्युइंगम असो वा बबलगम, दोन्ही तितकेच लोकप्रिय आहेत. विशेषकरून कुमारवयात आपल्याला बबलगमचा मोठा फुगा काढता येतो हे एक भारी कौशल्य आहे असे मानण्याचे दिवस असतात. एके काळी चित्रपटातल्या व्हिलनच्या पंटरचा उद्दामपणा दाखवण्यासाठी तो हमखास च्युइंगम चघळताना दिसायचा, तर त्याच्या अगदी विरुद्ध हिरॉईनचा बबलीपणा दाखवण्याचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे तिला बबलगमचे फुगे काढता येणं. नव्वदच्या दशकातले सर्व चित्रपट आठवून बघा. तरीही अगदी आजसुद्धा चारचौघांत मोठय़ांसमोर च्युइंगम चघळणं फारसं सभ्यपणाला धरून नाहीच. संशोधक त्यातल्या त्यात च्युइंगमचे फायदे शोधण्याचा प्रयत्न करतात. रडणे टाळण्यासाठी, एकाग्रचित्त होण्यासाठी च्युइंगमचा वापर होतो असं काहींचं म्हणणं आहे. तर शुगर फ्री च्युइंगम चघळणं दातांच्या बळकटीसाठी उपयुक्त ठरू शकतं असं काही दंतचिकित्सक म्हणतात.

च्युइंगम फक्त चघळण्यासाठी असतं. ते गिळल्यावर ७ र्वष पोटात राहतं हा लहानपणी ऐकलेला सर्वात मोठा गैरसमज; किंबहुना मुलांनी च्युइंगम खाऊ  नये यासाठी मोठय़ांनी तयार केलेला बागुलबुवाच. पण च्युइंगम काही पोटात राहत नाही. ते त्याचा मार्ग शोधतं, पण इतर पदार्थापेक्षा ते पचायला महाकठीण असतं हे मात्र खरं. आपल्यापैकी प्रत्येकाने विशिष्ट वयात च्युइंगम चघळलेलं असतं. विशिष्ट चव नसतानाही जगभरात चघळला जाणारा च्युइंगमसारखा दुसरा पदार्थ नसेल. तरीही च्युइंगम सुपरहिट आहे. च्युइंगम हा एक चाळा आहे. आपल्याला गुंतवून ठेवणारा आणि आपण म्हणू तितका वेळ आपल्यासोबत राहणारा. चॉकलेटसारखा तो विरघळत नाही. गोळीसारखा संपून जात नाही. आपण चघळत राहू तितकं त्याचं आयुष्य. म्हणूनच हे च्युइंगम हवंहवंसं वाटत असावं कदाचित.. त्याच्या न तुटण्याच्या, न विरघळण्याच्या रबरी ताणासकट!