महापुरामध्ये कोल्हापूर, सांगली जिल्ह्यतील शेतकरी, उद्योजक, व्यापारी यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना शासनाने कोणतीही अट न घालता १०० टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी येथे दिला.

पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चात ते बोलत होते. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सध्या सुरू आहे. ही प्रतिक्रिया  या संथ गतीने सुरू आहे. त्याच बरोबर सरकारतर्फे मिळणारी मदत तुटपुंजी आहे, असा आरोप करीत आज येथे शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दसरा चौक येथून राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. शिवारातील वाळलेल्या उसाची मोळी छोटय़ा ट्रॅक्टरला लावून शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत पूरग्रस्तांच्या वेदनांचा पाढा वाचण्यात आला. शासनाने व्यापाऱ्यांना तातडीने मदत दिली नाही तर व्यापारी कर भरणार नाहीत, असे कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले. कोल्हापूर शहरातील लाल व निळ्या रेषेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सुपारी घेऊ न ५०० एकर जागेचे आरक्षण बदलले असा आरोप करत उपमहापौर भूपाल शेटे यांनी त्यांच्याविरोधात आवाज उठवणार असल्याचे सांगितले. सतेज पाटील म्हणाले, की सरकारच्या दुर्लक्षामुळेच हे संकट ओढवले. महापूर आल्यानंतर वेळेत मदत मिळवण्यात पालकमंत्र्यांना अपयश आले. आता पालकमंत्री पूरप्रश्नाचा शिमगा काय करताय, अशी विचारणा करीत असले तरी तुमच्या चुकांमुळेच पूरग्रस्तांवर शिमगा करण्याची वेळ आली आहे, अशी टीका त्यांनी केली.