दिवसेंदिवस करोनाचा फैलाव वाढत असून करोना विषाणूचा संसर्ग वेळीच रोखण्यासाठी करोना संशयितांच्या स्वॅबची (घशाचा स्त्राव) तपासणी करणाऱ्या ‘कोव्हिड—१९’ तपासणीची दोन यंत्रे सुरू  झाली आहेत. सोमवारी मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत जवळपास १३२० नमुने तपासले आहेत.

करोना महामारीने साऱ्या जगाला हैराण केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात तत्काळ प्रतिबंधक उपाययोजना कठोरपणे राबविल्याने करोनाच्या भस्मासुराला काही अंशी थोपविणे शक्य होत आहे. लोकांनी घरात राहूनच करोनाविरुध्दचा लढा अधिक तीव्र करून सर्व यंत्रणा गतीमान केल्या. ५५ दिवसांच्या तीन टप्यात टाळेबंदी लागू असताना त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली.

कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत कोविड -१९ च्या दोन तपासणी मशीन कार्यान्वित झाल्या आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. यापूर्वी पुणे येथे तर त्यानंतर मिरज येथे प्रयोगशाळेत धाव घ्यावी लागत होती.

येथील प्रयोगशाळांमुळे कमी वेळात त्याच दिवशी तपासणी करून अहवाल येऊ लागले आहेत. यामुळे जास्तीत जास्त कोविड -१९ चे निदान होऊन लवकर रुग्ण उपचारावर आणणे शक्य झाले आहे. दरम्यानच्या, कालावधीत बाधित रुग्णांकडून होणारा प्रसार गती बरीचशी थांबली आहे.

हे मशीन ‘सीबीनॅट’ (काटिर्र्ज बेस्ड नुक्लिक अ‍ॅसिड अँप्लिफिकेशन टेस्ट) तंत्रज्ञानावर चालविले जात असून या मशीनची दिवसाची तपासणी क्षमता ३४० आहे. एका नमुन्याच्या तपासणीसाठी ४५ मिनिटे वेळ लागतो. अशाप्रकारे कोविड-१९ च्या तपासणीमध्ये कोल्हापूर जिल्हा स्वयंपूर्ण झाला आहे.