करोना काळात बांधकाम कामगारांना आर्थिक साहाय्य देण्याच्या निर्णयानुसार राज्यातील १३ लाख बांधकाम कामगारांना दीड हजार रुपयांचे अर्थसाहाय्य बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार ९ लाख १७ हजार नोंदीत कामगारांच्या खात्यात अवघ्या ४ दिवसात १३७ कोटी ६१ लाखांचा निधी जमा करण्यात आला आहे, अशी माहिती कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी बुधवारी दिली.

राज्यात कोविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांना दीड हजार रुपयांचे अर्थसाहाय्य बँक खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. १३ लाखांपैकी ९ लाख नोंदित बांधकाम कामगारांना अर्थसहाय करण्यात आले आहे. यामुळे कष्टकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले. गेल्या वर्षी करोना प्रादुर्भाव कालावधीत नोंदित बांधकाम कामगारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली होती.  नोंदित बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्याची मंडळाकडून योजना राबविण्यात येत असून आतापर्यंत २ लाखावर कामगारांची तपासणी करण्यात आली आहे.