कोल्हापूर : रेल्वे, सैन्य दल आणि स्टेट बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चौघा भामटय़ांवर १४ लाख २० हजार रुपये फसवणुकीचा गुन्हा रविवारी दाखल झाला आहे. या बाबत सय्यद शफिकउल्लाह पटेल (वय ३५, रा, कोल्हापूर) यांनी रविवारी (ता. २१) राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

बाजीराव उर्फ सागर मोहिते (रा. कोल्हापूर), सागर ब्रह्मदेव भोसले (रा.बारामती, जि. पुणे), सुदेश मधुकर आव्हाड आणि आशिष सुदेश आव्हाड (दोघेही रा. कोंढवा, पुणे) या चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

राजारामपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सय्यद पटेल यांची जानेवारी २०१५ मध्ये  कनाननगरातील बाजीराव उर्फ सागर मोहिते याच्याशी ओळख झाली. मोहिते याने पटेल यांच्या भाच्याला रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखवले. याशिवाय चक्कोली याचा मित्र लक्ष्मण गोपाल लक्षाणी याला स्टेट बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. चक्कोली व लक्षाणी या दोघांच्याही नातेवाइकांकडून मोहिते याने सुरुवातीला आठ लाख रुपये घेतले. पटेल यांना दिल्लीत बोलवून लक्षाणी याच्या नावे स्टेट बँकेतील लिपिकपदाचे बनावट नियुक्तिपत्र दिले. यानंतर पटेल यांना बंगळुरू येथे बोलवून चक्कोली याची दक्षिण मध्य रेल्वेत तिकीट तपासनीसपदावर नियुक्ती केल्याचे त्याने सांगितले. या वेळी पुन्हा पटेल यांच्याकडून त्यांनी पैसे उकळले.

संशयित बाजीराव मोहिते याने पुण्यातील साथीदार सागर भोसले, सुदेश आव्हाड आणि आशिष आव्हाड यांच्या मदतीने बनावट नियुक्तिपत्रे देऊन फसवणूक केली. दोन्ही नियुक्तिपत्रे बनावट असल्याचे लक्षात येताच पटेल यांनी पुण्यात जाऊन मोहिते याच्याशी संपर्क साधला. सर्व पैसे परत मागितले. वारंवार मागणी करूनही मुख्य सूत्रधार मोहिते याने पैसे परत केले नाहीत.