अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या एकूण १४३ उमेदवारांपकी १४२ अर्ज वैध ठरले. हरिभाऊ लिमये यांचा एकमेव अर्ज अवैध ठरला असून पात्र उमेदवारांची यादी उद्या बुधवारी महामंडळाच्या येथील कार्यालयात प्रसिद्ध होणार आहे. किमान सहा-सात पॅनेल िरगणात उतरण्याची शक्यता असून बहुतांश सर्वच पॅनेलचे प्रमुख निवडक कार्यकर्त्यांसह महामंडळाच्या कार्यालयात उपस्थित होते.
अकरा एप्रिलपर्यंत माघारीची मुदत असून त्यानंतर मतदान केंद्रे जाहीर केली जातील. २४ एप्रिलला मतदान होणार होणार असल्याची माहिती  निवडणूक समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. के. व्ही. पाटील यांनी दिली. या वेळी समिती सदस्य अ‍ॅड. प्रशांत पाटील, आकाराम पाटील, पद्माकर कापसे, पी. जे. अतिग्रे आदी उपस्थित होते. अर्ज छाननीवेळी काही अर्जावर हरकतीही आल्या. पण, त्याचे निरसन करून अर्जाची छाननी झाली.
दरम्यान, एकीकडे अर्ज छाननी सुरू असतानाच दुसरीकडे काही पॅनेलची यादी सोशल मीडियावरून सर्वत्र व्हायरल होऊ लागली. पण, या याद्या अंतिम नसल्याचे सांगण्यात आले. माजी अध्यक्ष विजय पाटकर यांच्या पॅनेलची यादीही आज सोशल मीडियावरून सर्वत्र शेअर झाली. याबाबत पाटकर यांच्याशी संपर्क साधला असता अद्यापि पॅनेल जाहीर झाले नसून दोन दिवसांत याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगितले.