निजामुद्दीन येथील ‘तबलिगी जमात’साठी गेलेल्या आणखी १६ लोकांचा शोध कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यांना पन्हाळा तालुक्यात संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी सांगितले. दरम्यान नव्याने सापडलेल्या या तबलिगींमुळे कोल्हापूर जिल्ह्य़ातून नेमके किती लोक मरकजसाठी गेले होते यावरून पोलीस आणि प्रशासनापासून सगळेच बुचकळय़ाच पडले आहेत. या लोकांचा जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात शोध सुरू केला आहे. तर ही संख्या अजून स्पष्ट न झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

निजामुद्दीन येथील मरकजसाठी चाळीसहून अधिक लोक गेले असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. यातील दिल्ली येथे २१ तर जिल्ह्य़ात १० आणि अन्यत्र ९ जणांचे विलगीकरण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने गुरुवाकी देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आज आणखी आणखी १६ तबलिगींचा शोध लागल्याने जिल्ह्य़ात खळबळ उडाली आहे.

शाहूवाडी तालुक्यात हे सर्व जण सापडले असून हे सर्वजण १६ मार्च दरम्यान जिल्ह्यात परत आल्याची माहिती मिळाली आहे. या सर्वाची आरोग्य तपासणी केली असून त्यांच्यात करोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. तरीही दक्षतेसाठी त्यांचे अलगीकरण करण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही घरात अलगीकरण करण्याचा सल्ला दिला असून त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे.

दरम्यान, निजामुद्दीन येथील ‘तबलिगी जमात’साठी गेलेल्या ‘तबलिगीं’नी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत स्वता:हून पुढे येत माहिती द्यावी तसेच आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन केलेले असतानाही अजूनही या लोकांचा शोध लागत नाही.

शिवसेनेची चौकशीची मागणी

निजामुद्दीन येथे ‘तबलीग जमात’साठी कोल्हापुरातून गेलेल्या मुस्लिमांचा नेमका आकडा समजत नसून  पोलिसांच्या शोध मोहिमेनंतर यांची संख्या वाढत असल्याने या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी जिल्हाधिकारी देसाई यांना याबाबत एक निवेदन दिले आहे. ‘तबलीग जमात’साठी गेलेल्या मुस्लिमांचा चुकीचा आकडा सांगणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी यामध्ये केली आहे. परप्रांतीय मुस्लिमांची माहिती मुस्लीम बोर्डिगने लपवून ठेवल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत मुस्लीम बोर्डिगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांनी आम्हाला जी माहिती मिळते आहे, ती आम्ही प्रशानाला देत असल्याचे सांगितले.