जिल्ह्यातील करोना सकारात्मक असलेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. बुधवारी १९ नवीन करोना सकारात्मक रुग्ण आढळले. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्येने दीडशेचा आकडा ओलांडला आहे. जिल्ह्यात १५५ करोनाबाधित रुग्ण आहेत.

गेल्या आठवडय़ापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा एकेरी होता. शिवाय बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिलासाजनक वातावरण होते. गेल्या पाच — सहा दिवसांमध्ये त्यामध्ये झपाटय़ाने वाढ होत चालली आहे. काल एकाच दिवसात ५३ रुग्णांची भर पडली होती. आजवरच्या रुग्ण संख्येत ही संख्या सर्वोच्च ठरली. आज सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १९ रुग्ण करोना सकारात्मक असल्याचे आढळले आहे. यामुळे कोल्हापूरकरांच्या चिंतेमध्ये आणखी भर पडली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्ण संख्येची आकडेवारी बाबत सातत्याने गोंधळ होत आहे. वैद्यकीय विभागांमध्ये एकवाक्यता नसल्याने वेगवेगळी माहिती येत असल्याने लोकही संभ्रमात पडले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती देण्यासाठी तीन अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवली आहे. आता त्यांच्याकडून तरी याबाबत काही सुधारणा होते का हे लक्षवेधी ठरले आहे.

कोल्हापूर जिल्हा हा केसरी विभागात होता. तो सुरक्षित अशा हिरव्या विभागाकडे वाटचाल करू लागला असताना आठवडय़ाभरात चित्र पालटले आहे. तो लाल विभागात जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र राज्य शासनाने टाळेबंदीच्या नियम व अटीमध्ये बदल केला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील करोना सकारात्मक रुग्णांच्या संख्येने दीडशेचा आकडा ओलांडला असला तरी कोल्हापूर अद्यापही केशरी विभागातच राहिला आहे. यामुळे लाल विभागातील कडेकोट नियम कोल्हापूरकरांना सहन करावे लागणार नाहीत. तरीही कोल्हापूर समोरील धोका वाढला आहे. अद्यापही मोठय़ा प्रमाणात शेकडो रुग्णांचे करोना संसर्ग तपासणी अहवाल प्रलंबित आहेत.