कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी आणखी २० करोना बाधित रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात आता १९५ सकारात्मक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पंढरपूर येथील बंदोबस्तवरील सर्व पोलिसांचे अहवाल नकारात्मक आल्याने दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, इचलकरंजी येथील एका लोकप्रतिनिधीच्या मुलास व नातवाला करोना झाल्याचे दिसून आले होते. त्यांच्या घरात भावाची सून व एक कर्मचारी यांना बाधा झाल्याचा अहवाल आज मिळाला. तर, लोकप्रतिनिधीसह अन्य कुटुंबीयांचे अहवाल नकारात्मक आले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातील पोलीस पंढरपूर येथे आषाढी एकादशी निम्मित बंदोबस्तावर गेले होते. तेथून परत आल्यावर या सर्वांना वरील अलगीकरण केंद्रात दाखल केले होते. तीन अधिकाऱ्यांसह ५८ पोलीस कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचे आज अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व नकारात्मक आहेत. जिल्ह्यतील कोव्हिड रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी याचा वापर होणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. देखरेख समिती आणि टास्क फोर्स भेट देऊन योग्य उपचार होत आहेत की नाहीत याचे नियंत्रण ठेवणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.