कोल्हापूर जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या साडे सहा हजाराच्यावर गेली आहे. शुक्रवारी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार  २०० रुग्णांची भर पडली तर आठ जणांचा मृत्यू झाला. तर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सामूहिक संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान आणखी बिकट झाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात करोना बाधित रुग्ण संख्या व मृतांचा आलेख वाढत चालला आहे. बाधित रुग्ण संख्या सहा हजाराच्या वर गेली आहे. त्यामध्ये सायंकाळी दोनशेहून अधिक रुग्णांची भर पडल्याने हा आकडा साडेसहा हजार पर्यंत जाताना दिसत आहे. सायंकाळी प्राप्त अहवालानुसार कोल्हापुरातील जवाहर नगर, शहापूरी व मंगळवार पेठ येथील एक जण, हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली, इचलकरंजी शहर, कागल तालुक्यातील दौलतवाडी, मिरज तालुक्यातील समडोळी व करवीर तालुक्यातील खुपिरे येथील प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींची संख्या १८० पर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यात चार हजार व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. तर आजवर २५३४ रुग्ण बरे होऊन घरी पोहोचले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या अपर मुख्य सचिवांची मदत

मूळ इचलकरंजी शहरवासी असलेले आणि राज्यभर कार्यरत असलेल्या अधिकारी वर्गाच्या ‘आम्ही इचलकरंजीकर अधिकारी’ या मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या नेतृत्वात कार्यरत समाज माध्यम समूहाच्यावतीने इचलकरंजीमधील आयजीएम रुग्णालयात गरम पाण्याचे १० डिस्पेन्सर देण्यात आले. त्यामुळे रुग्णांना पिण्यासाठी गरम पाण्याची सोय झाली आहे. जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, शालेय पोषण अधीक्षक प्रवीण फाटक, नगर भू मापन अधिकारी शशिकांत पाटील यांनी या वस्तू आज वैद्यकीय अधिक्षक डॉ. रवींद्र शेटे यांच्याकडे सुपूर्द केल्या.