15 October 2019

News Flash

पोलंडच्या ‘त्या’ निर्वासितांकडून कोल्हापूरच्या भूमीला वंदन

कोल्हापूर जवळील वळीवडे येथे १९४२ ते ४८ या काळात या निर्वासितांनी बालपण व्यतीत केले आहे.

पोलंडच्या नागरिकांनी कोल्हापूर  शहरातील गणेशोत्सव विसर्जन सोहळ्याचा आनंद घेतला.

वळीवडे कॅम्पच्या आठवणींना उजाळा

कोल्हापूर : दुसऱ्या महायुद्धादरम्यान निर्वासित होऊन कोल्हापूरजवळ वास्तव्य केलेल्या पोलंडच्या २७ नागरिकांचे भारतात गुरुवारी आगमन झाले. येथे आल्यानंतर कोल्हापूरच्या भूमीला वंदन करून वळीवडे कॅम्पच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. शुक्रवारी त्यांनी ऐतिहासिक किल्ले पन्हाळा येथे भेट देऊन मराठेशाहीचा इतिहास समजून घेतला.

कोल्हापूर जवळील वळीवडे येथे १९४२ ते ४८ या काळात या निर्वासितांनी बालपण व्यतीत केले आहे. बालपण व्यतीत केलेले हे नागरिक व त्यांचे सहकारी असे एकूण २७ नागरिक काल दाखल झाले आहेत. करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शीतल मुळे, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया यांनी त्यांचे प्रशासनाच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

हॉटेल सयाजी येथे आगमन झाल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती, याज्ञसेनी फत्तेसिंह सावंत यांनी कुंकुमतिलक लावून व पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. काल या नागरिकांनी शहरातील गणेशोत्सव विसर्जन सोहळ्याचा आनंद घेतला.

उप परराष्ट्र मंत्री प्रिझिदॅज यांच्या नेतृत्वाखाली द्विस्तरीय शिष्टमंडळ आज रात्री कोल्हापुरात दाखल होत आहे. १४ सप्टेंबर रोजी ते कोल्हापूर शहरातील उद्योजकांशी संवाद साधणार आहेत.

बांगडीची लुथांची आठवण

वळीवडे येथे लुथा मारिया आईसमवेत रहात असताना आईने  कॅम्पमध्ये हातात घातलेली बांगडी पोलंडच्या निर्वासित महिलेने आठवण म्हणून जपून ठेवली आहे. ७२ वर्षांपासून हातात असलेली बांगडी स्टीलची असून भारतातील शाहू महाराजांच्या भूमीची आठवण जपून ठेवल्याचे मारिया यांनी सांगितले.

 

 

First Published on September 14, 2019 4:22 am

Web Title: 27 poland citizen visit historic panhala fort zws 70