करोनाचं हॉटस्पॉट बनलेल्या बेळगाव जिल्ह्यात रविवारी एकाच दिवशी ३० रुग्ण आढळले. यापूर्वी बेळगाव जिल्ह्यात अनेक करोना रुग्णांचा इतिहास हा तबलीगींशी जुळला होता. पण आज आढळलेले रुग्ण हे राजस्थानमधील अजमेर येथील आहेत. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील २२ जणांचा समावेश असून बागलकोट, बदामी जिल्ह्यातील आठ जणांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजस्थानातील अजमेर येथे कर्नाटकातील काही भाविक आबालवृद्ध भाविक गेले होते. टाळेबंदीमुळे ते राजस्थानमध्ये अडकून पडले होते. दोन दिवसापूर्वी ते बेळगाव जिल्ह्याच्या प्रवेश ठिकाण असलेल्या कोगनोळी टोल नाका येथे आले होते. त्यांनी बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण कर्नाटक शासनाची विशेष परवानगी असल्याशिवाय कोणालाही आत राज्यात प्रवेश दिला जात नाही. या प्रवाशांनी बेळगावातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रवेश केल्यानंतर त्यांना निपाणी जवळील मोरारजी वस्तीशाळा येथे ठेवण्यात आले. त्यांची आरोग्य तपासणी केली असता बेळगाव जिल्ह्यातील २२ जणांना तर बदामी व बागलकोट जिल्ह्यातील आठ जणांना अशा ३० जणांना करोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना बेळगाव येथील करोना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

निपाणी सुरक्षित

यापूर्वी बेळगावात १४ एप्रिल रोजी १४ तर ८ मे रोजी ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आज तब्बल ३० रुग्ण आढळल्यानेएकादिवशी सर्वाधिक रुग्ण नोंदले गेले आहेत. दरम्यान, “या घटनेमुळे निपाणीला कसलाही धोका नाही. येथील व्यवहार सुरळीत राहतील” असे निपाणीच्या आमदार तथा राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री शशिकला ज्योल्ले यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले.

बेळगावचे अजमेर कनेक्शन

सीमाभागाचे केंद्रस्थान असलेल्या बेळगाव येथे करोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. बेळगाव जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या ८५ पर्यंत गेली आहे. बेळगाव जिल्ह्यात आजवर आढळलेले बरेचशे रुग्ण निजामुद्दीन येथे येथील जाऊन आलेले होते. बेळगावचे पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी तबलीगींमुळे जिल्ह्यात करोना आला असे विधान केले होते. आता बेळगाव जिल्ह्यात अजमेर कनेक्शन उघडकीस आले आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 30 crona infected patients found in belgaum district all are passengers of ajmer aau
First published on: 10-05-2020 at 21:05 IST