कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी ३४ करोना सकारात्मक रुग्ण वाढल्याची नोंद झाली. आजअखेर जिल्ह्यात २७९ सकारात्मक रुग्ण आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात शुRवारी ३४ सकारात्मक रुग्ण आढळले. त्यामध्ये पन्हाळा तालुक्यातील करंजफेन येथे एकाच कुटुंबातील 3 पुरूष व ५ महिलांचा समावेश आहे. तर इचलकरंजी येथे सात रुग्ण वाढल्याने चिंता वाढली आहे. याशिवाय गडहिंग्लज— ४,राधानगरी, शाहूवाडी  व हातकणंगले—प्रत्येकी १ , कोल्हापूर शहर — ६ ,शिरोळ — ३,कसबा बावडा— २,कागल — १ ( सांगाव  ) ,गारगोटी — १, शिये — १ यांचा समावेश आहे. आजअखेर ७९७ जणांना घरी पाठवण्यात आले आहे. तर २२ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

सामाजिक अंतराचा फज्जा

करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे इचलकरंजी शहरात आठवडाभर टाळेबंदी कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज चौथ्या दिवशी बाजाराचा दिवस असल्याने सकाळी ५ तास भाजीपाला खरेदीसाठी मोकळीक देण्यात आली होती. सकाळपासूनच बाजारात लोकांनी इतकी प्रचंड गर्दी केली की सामाजिक अंतर नियमाचा फज्जा उडाला. स्थानिक प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे दिसत होते. त्यावरून समाज माध्यमात टीकेची झोड उठवतानाच चिंता व्यक्त केली जात होती. मुखपट्टी वापरणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाल्याचे चांगले चित्रही दिसून आले.