कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या ४५ हजारांच्या घरात गेली असताना करोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यात ३५ हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यामुळे नागरिकांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जून महिन्यापासून करोना संक्रमण झपाटय़ाने वाढले. रुग्णांची संख्या दररोज ५०० ते एक हजार इतक्या प्रमाणात होती.

यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. केंद्र शासनाने टाळेबंदी शिथिल केली गेली तरी करोना संक्रमण वाढत असल्याने स्थानिक पातळीवर बंदचे प्रमाण मागील महिन्यापर्यंत सुरू होते.

मात्र या महिन्यांमध्ये करोनारुग्णांचा आलेख घसरत आहे. जिल्ह्यात सध्या पंचेचाळीस हजारांहून अधिक बाधित आहेत. आता करोना चाचणी सकारात्मक आल्यानंतरही रुग्णांना किमान उपचार याची खात्री मिळू लागली आहे. तर दुसरीकडे रुग्णांची संख्याही कमी होत चालली आहे. बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.

जिल्ह्यात करोनामुक्त रुग्णांची संख्या पस्तीस हजारांहून अधिक झाली असल्याने करोनाची भीतीचे सावट काही प्रमाणामध्ये कमी झाले आहे.

तपासणीची संख्या कमी झाल्यामुळे रुग्ण कमी दिसतात, असे वैद्यकीय क्षेत्रातून सांगितले जात आहे.