कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात करोनाबाधित ४८ रुग्ण आढळले. यामध्ये सर्वाधिक रुग्ण इचलकरंजीमध्ये १५ होते. तर, कोल्हापूर शहरात सहा नवे रुग्ण आढळले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन दिवसापूर्वी करोनाबाधित रुग्णसंख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडला होता. जिल्ह्यातील करोना प्रतिबंध उपाययोजनांची अंमलबजावणी कडक केली असतानाही रुग्णसंख्या मात्र वाढतच चालली आहे. रविवारी प्राप्त अहवालानुसार ४८ रुग्ण करोना सकारात्मक आले आहेत. कोल्हापूर शहरातही टिंबर मार्केट परिसरात ४, मंगळवार पेठ व राजोपाध्येनगर येथे एक रुग्ण आढळला. याच बरोबर गडहिंग्लज तालुक्यातील गडहिंग्लज येथील शांतिप्रकाश कॉलनी तसेच शेंद्री व कानेवाडी येथे प्रत्येकी एक रुग्ण, चंदगड व आजरा तालुक्यात प्रत्येकी दोन रुग्ण, तर वळीवडे या करवीर तालुक्यातील गावात एक रुग्ण आढळला आहे.

इचलकरंजीत नेते-प्रशासनाची मनमानी

इचलकरंजी शहरातील आज दिवसभरात १५ रुग्ण आढळले. बेपारी गल्लीमध्ये १० तर आणि गणेशनगर १, त्रिशुल चौक २, महादेवनगर येथे २ रुग्ण आढळले. शहरातील एकूण रुग्णसंख्या १२७ झाली आहे. यातील ४० रुग्ण बरे होऊन परतले घरी आहेत. तर ९ मयत आहेत. बेपारी गल्लीतील बारा रुग्णांची करोना चाचणी होऊनही त्यांना घरीच ठेवले होते. त्यातील १० जणांचा अहवाल सकारात्मक आला असल्याने या भागात खळबळ माजली. यातील काही रुग्ण दिवसभर परिसरात फिरत असल्याच्या तक्रारी आहेत. एका स्थानिक नेत्याच्या सांगण्यावरून प्रशासनाने त्यांना घरी ठेवले होते पण ते सकारात्मक असल्याचे दिसल्यावर प्रशासनाची एकच धावपळ उडाली. प्रशासनाच्या बेपर्वाई कारभारावर नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.