कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी करोना बाधित रुग्णांच्या संख्येत ४९ ने वाढ झालेली आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांचा आकडा आता ५५६ वर पोहचला आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन जिल्हाप्रशासनाने केलं आहे. याचसोबत जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना अधिक सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बाहेरच्या जिल्ह्यातील रेड झोनमधून आलेल्या लोकांमुळे कोल्हापुरात करोनाचा फैलाव होत आहे. शनिवारी सकाळी २९ रुग्णांचे करोना चाचणी अहवाल सकारात्मक आले, तर सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी २० जणांचे करोना चाचणी अहवाल सकारात्मक आले आहे.

जिल्हा प्रशासन सतर्क –

पुणे, मुंबई, नवी मुंबई, रायगड, सोलापूर आणि सांगली या बाधित जिल्ह्यांमधून ३ मे नंतर अंदाजे ३० हजार व्यक्ती जिल्ह्यामध्ये आल्या. जिल्हा प्रशासनाने साडेसतरा हजार व्यक्तींच्या करोना चाचणी तपासणी केली. यामध्ये आजअखेर ५५६ व्यक्तींवर कोव्हिड काळजी केंद्रात उपचार सुरु आहेत. ज्या व्यक्ती संस्थात्मक आणि गृह अलगीकरणात आणि व्याधीग्रस्त आहेत, अशा व्यक्तींची विशेष काळजी प्रभाग तसेच ग्राम समितीने घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

डॉक्टरांना प्रती दिन २ हजार –

कोव्हिड-१९ या रोगाच्या उच्चाटनासाठी खासगी डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी म्हणून सलग ७ दिवस सेवा देणाऱ्या खासगी पदवीधर डॉक्टरांना प्रती दिन २ हजार रुपये तसेच उच्च पदवीधरांना प्रती दिन ३ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. अपवादात्मक प्रकरणात ३ ते ४ दिवसांची सेवाही स्वीकारली जाईल. या कर्तव्यावर असणाऱ्या डॉक्टरांना विशेष प्रमाणपत्रही जिल्हा प्रशासनामार्फत दिले जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.