२० लाख लिटर दूध संकलनाचा आराखडा

कोल्हापूर : गोकुळचे दूध संकलन वाढवण्यासाठी जिल्‘ातील शेतकऱ्यांना म्हैस खरेदीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत ५०० कोटी रुपयांचे वित्तसाहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केली. गोकुळचे सध्याचे १३ लाख दूध संकलन हे प्रतिदिनी २० लाख लिटर पर्यंत नेण्यासाठी नियोजनाचा आराखडा बनवला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. गोकुळ मध्ये मंत्री मुश्रीफ, मंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते अमृत कलश पूजनाचा कार्यक्रम झाला. अध्यक्ष विश्वास पाटील यांनी स्वागत केले, या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

वारणा, कृष्णा आणि संगमनेर दूध संघाचे दूध संकलन सुमारे पाच लाख लिटर असतानाही पगारावर जवळपास २० कोटींपेक्षा कमी खर्च होतो, तर  गोकुळमध्ये १३० कोटी रुपये वर्षांला खर्च होत असल्याने कपात करण्याची सूचना त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्ताबदलाची चाहूल

गोकुळ मध्ये तीस वर्षांनंतर झालेल्या अभूतपूर्व सत्ताबदलाचे किमयागार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील—यड्रावकर यांनी प्रथमच मुख्यालयात प्रवेश केला. सत्तांतर झाल्याचे कार्यस्थळी पदोपदी दिसत होते. जुन्या नेत्यांच्या प्रतिमा गायब होऊन तेथे नव्या नेत्यांना स्थान मिळाले होते. नियोजनाच्या आखणी आणि कामकाज पद्धतीत झालेले बदल नजरेत भरणारे होते.

महाडिकांवर टीका

मुश्रीफ — पाटील यांनी आधीचे नेते महादेवराव महाडिक यांच्या कारभारावर टीकास्र डागले. गोकुळमध्ये गेल्या काही वर्षांपासून उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंगसारखा कारभार केला जात असल्याचे मुश्रीफ म्हणाले. महाडिकांना गेल्या दहा वर्षांत टँकर वाहतुकीच्या माध्यमातून १३४ कोटी, तर दूध विक्री कमिशन कोल्हापूर माध्यमातून ५० कोटी रुपये मिळाल्याची आकडेवारी सतेज पाटील यांनी जाहीर करीत शेकडो कोटी रुपयांची माया जमवण्यासाठी त्यांना गोकुळची सत्ता हवी होती, असे सांगितले.