कोल्हापूर : बेळगाव महापालिकेच्या ५८ प्रभागांसाठी शुक्रवारी प्राथमिक अंदाजानुसार ५५ टक्के मतदान झाले. मराठी अस्मितेचे दर्शन घडवण्यासाठी मराठी भाषकांनी हिरिरीने मतदानात सहभाग नोंदवला.

सीमालढ्याचे प्रमुख केंद्र असलेल्या बेळगाव महापालिकेची निवडणूक आठ वर्षांनंतर आज झाली. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. काही मतदान केंद्रांमध्ये मतदारांची नावे नसल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मतदान केल्यानंतर मतदान यंत्रात पक्षचिन्ह उमटत नसल्याची तक्रार काही उमेदवारांनी केली. वैभवनगर येथे काहीकाळ तणावाची स्थिती झाल्यानंतर पोलिसांनी धाव घेऊन शांतता प्रस्थापित केली. प्रशासनाने मतदानाची जय्यत तयारी केली होती. ८२६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष प्रथमच चिन्हावर उतरले आहेत. त्यामध्ये भाजप ५५, काँग्रेस ४५, धर्मनिरपेक्ष जनता दल ११, आम आदमी ३७, एमआयएम ७, अन्य दोन अपक्ष अशा २१७ उमेदवारांचा समावेश आहे.

मराठी अस्मितेचे दर्शन

या निवडणुकीसाठी १८५ उमेदवार रिंगणात आहेत. मराठी अस्मितेसाठी मराठी भाषकांनी आजच्या मतदानात उत्साहाने सहभाग नोंदवला. अनेक मतदारांनी गुढीपाडव्याप्रमाणे घरावर भगवे झेंडे लावून मराठी अस्मितेचे दर्शन घडवले. मतदानाला जाताना भगव्या रंगाच्या मुखपट्टी वापरण्यात आली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने २१ प्रभागांत उमेदवार दिले असून अन्य प्रभागांत मराठी भाषक उमेदवारांना स्वतंत्र लढण्याची मुभा दिली आहे.