घरगुती गॅस मोठय़ा टाकीतून लहान टाकीमध्ये भरत असताना स्फोट झाल्याने निगडेवाडी गाव हादरले. या स्फोटात सात जण जखमी झाले असून, त्यातील तिघे जण गंभीर जखमी आहेत. स्फोटाची तीव्रता इतकी होती, की दुकानातील काऊंटरचा चक्काचूर होण्याबरोबरच जखमी सुमारे १० फूट अंतरावर जाऊन पडले होते. जखमींना येथील सीपीआर इस्पितळात दाखल केले असून, वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार सुरू केले.
शहराजवळ निगडेवाडी हे गाव आहे. येथे मोहित गॅस नावाचे दुकान आहे. या दुकानात वाहनांचे गॅसकीट बसवून देण्याचे काम केले जाते. तसेच घरगुती वापरातील मोठय़ा टाकीतील गॅस लहान टाकीमध्ये भरून विक्री केली जाते. अशाप्रकारचे काम गुरुवारी संध्याकाळी सुरू होते. याच वेळी गॅसचा जोरदार स्फोट झाला. स्फोटाच्या तीव्रतेमुळे दोन कामगारांसह पाच ग्राहक १० फूट अंतरावर जाऊन कोसळले. दुकानातील फíनचर काऊंटरचा चक्काचूर झाला. जखमींच्या शरीरावर विविध ठिकाणी भाजल्याने ते अत्यवस्थ झाले होते. शेजारील लोकांनी त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात हलवले. वैद्यकीय पथकाने तातडीने हालचाली करीत सर्व रुग्णांवर उपचार सुरू केले.
घटनेतील जखमींमध्ये प्रकाश मधुकर माने (वय ३२, रा. तिरपण, ता. पन्हाळा), संतोष बाबा पाटोळे (वय २४, रा. निगडेवाडी), संतोष दत्तात्रय खिलारे (वय ३२, रा. मलकापूर), युवराज अण्णासाहेब पाटील (वय २४, रा. अंबप), सुरेश महादेव पाटील (वय ४८, रा. अंबप), जितेंद्रसिंग राधेसिंग (वय २२, रा. दिल्ली) व सागर यशवंत माने (रा. मानेवाडी) यांचा समावेश आहे. जितेंद्रसिंग हा मोठय़ा टाकीतून लहान टाकीत गॅस भरत होता. खिलारे व माने हे दोघे कर्मचारी आहेत. उर्वरित काही कामानिमित्त दुकानात आले असताना स्फोट होऊन जखमी झाले.