महापुरामुळे व्यावसायिकांचे उद्योग-व्यापाराचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. व्यावसायिकांना नुकसानीच्या ७५ टक्के नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती सहकार, मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

इचलकरंजी नगरपालिका कार्यालयात मंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पूरग्रस्त भागाची आढावा बैठक घेण्यात आली. आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्ष अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, मुख्याधिकारी दीपक पाटील, अतिरिक्त मुख्याधिकारी पवन म्हेत्रे उपस्थित होते. शामसुंदर मर्दा यांनी दगडूलाल फाउंडेशनकडून पूरग्रस्तांसाठी ५१ लाखांची मदत देशमुख यांच्याकडे सुपूर्द केली.

शासकीय योजनापासून कोणी वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात यावी, पंचनामे करताना अटी शर्ती न पाहता मदत करावी, अशी सूचना करून मंत्री देशमुख म्हणाले, पशुधनाचे नुकसानीचे शासनामार्फत भरपाई देण्यात येणार असून एक समिती स्थापन केली आहे. रेशन कार्ड एक परंतु कुटुंब विभक्त आहेत, त्यांना स्वतंत्र मदत देण्यात येणार आहे.

चंदूर गाव दत्तक

राज्य शासनाने गावे दत्तक घेण्याच्या केलेल्या आवाहनानुसार चंदूर हे गाव सोलापूर सोशल फाउडेशनने दत्तक घेतले आहे. पूर बाधितांच्या पाठीमागे सरकार भक्कमपणे उभे असल्याची ग्वाही देशमुख यांनी चंदूर गावास भेट दिल्यावर दिली.