कोल्हापूर : बारावीच्या परीक्षेला मंगळवारी सुरुवात झाली असताना ७५ वर्षांचे एक तरुण ही परीक्षा देत आहेत. नातवंडे अभियंता झाले असताना आता या वयात आजोबांना बारावी पूर्ण करण्याची मनीषा बाळगली असून ते पूर्ण तयारीनिशी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. रवींद्र बापूसाहेब देशिंगे असे त्यांचे नाव आहे. अल्पशिक्षित असले तरी देशिंगे यांचे यशकथा डोळ्यात भरणारी आहे.

देशिंगे हे १९६३ साली दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. काही कारणांनी पुढचे शिक्षण घेता आले नाही. मात्र, किराणा, औषध दुकान, बांधकाम व्यवसाय आणि आता वाहन अशा विविध व्यवसायात उतरून लक्षणीय यश मिळवले. त्यानंतर त्यांना बारावी उत्तीर्ण होण्याचे मनावर घेतले. त्यासाठी येथील रात्र महाविद्यालयात प्रवेश घेऊन अकरावी उत्तीर्ण झाले.

गतवर्षी ते बारावीच्या परीक्षेला बसले होते. इंग्रजी, समाजशास्त्र व मराठी या विषयात ते अनुत्तीर्ण झाले. यंदा नव्या उत्साहाने आणि तयारीने ते पुन्हा परीक्षेला बसले आहेत. आज ते येथील गोखले महाविद्यालयातील केंद्रात परीक्षेसाठी आल्यानंतर संस्थाचालकांनी स्वागत केले. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

या वेळी देशिंगे यांनी ‘ज्ञान देणे आणि घेणे हेच आयुष्याचे सार आहे’ अशी शिकवण प्रायव्हेट हायस्कूलचे शिक्षक अष्टेकर यांनी दिली होती. त्याचे स्मरण ठेवून आता बारावीची परीक्षा देत असून उत्तीर्ण होण्याचा विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.