कोल्हापूर जिल्ह्यातील करोना रुग्णसंख्या टाळेबंदी लागू असतानाही वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या तीन हजारावर वर गेली असल्याने नव्याने वाढलेल्या रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करताना प्रशासनाची कसरत होत आहे.

जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहेत. तर, गेल्या बारा तासांत आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ८५ वर पोहोचली आहे. उपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ता ११०९ झाली आहे. एकूण २११३ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. करोना संसर्ग हा सामूहिक प्रसार होत असल्याने शहरासह जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

रुग्णालयात खचाखच गर्दी

रुग्ण संख्या वाढत असल्याने सीपीआर हे जिल्हा रुग्णालय तसेच शहरातील खासगी रुग्णालय रुग्णांनी खचाखच भरली आहेत. तरीही या संकट काळात कोल्हापुरातील अनेक रुग्णालयांमध्ये चांगल्या पद्धतीने करोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. मात्र नव्याने रुग्ण वाढल्याने त्यांची सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. सद्यस्थितीत ही सुविधा उपलब्ध करून देणे मुश्किल झाले आहे.

रुग्णाचा उपचाराविना मृत्यू

कोल्हापूरनजीक बाजारपेठ असलेल्या गांधीनगर येथील गंभीर करोनाबाधित रुग्णाचे नातेवाईक काल रात्री रुग्णाला घेऊन सीपीआर रुग्णालयात आले पण खाट शिल्लक नसल्याचे कारण सांगून रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार दिला. नातेवाईकांनी प्रशासनाकडे उपचार करण्यासाठी पिच्छा पुरवूनही नकारघंटा ऐकवली गेली.  रुग्णाला घेऊन नातेवाईकांनी निराश मनाने गाव गाठले. पहाटे उपचाराविनाच त्या रुग्णाचा मृत्यू झाला.

व्हेंटिलेटरची कमतरता

अशा परिस्थितीत शासकीय वैद्यकीय यंत्रणेने पर्यायी व्यवस्थेचा शोध सुरू केला असल्याचे सांगण्यात आले. कोल्हापुरात सीपीआर, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे व्हेंटिलेटर रुग्णांत वाढ होत असल्याने आणखी चिंता वाढत आहे. सीपीआर रुग्णालयात व्हेंटिलेटर शिल्लक नसल्याचे आरोग्य विभागाकडून संबंधित रुग्णांना वा नातेवाईकांना सांगण्यात येत आहे. एकीकडे जिल्ह्यात पुरेशा वैद्यकीय सुविधा व उपचार करोना रुग्णांना दिल्या जात असल्याचे सांगितले जात असले तरी रुग्णांना येणारा अनुभव समाधानकारक नसल्याचे दिसते.