लहान मुलं कधी काय करतील याचा नेम नाही. यामुळेच पालकांनी सतत त्यांच्यावर लक्ष ठेवणं अपेक्षित असतं. मुलांवर लक्ष नसलं तर काय होऊ शकतं याचा प्रत्यय बेळगावमधील एका घटनेमुळे आला आहे. मुलाला शेतात नेल्यावर वडील त्याचा व्हिडीओ शूट करण्यात व्यस्त असताना चिमुरड्याने खेळता खेळता चक्क सापाचं शेपूट पकडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंगाळी बुद्रूक गावात ही घटना घडली आहे.

घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत दिसत आहे त्याप्रमाणे वडील आपल्या मुलाला खेळवण्याचा प्रयत्न करत असून मोबाइलमध्ये त्याचा व्हिडीओ शूट करत आहेत. यावेळी चिमुरडादेखील मोकळ्या शेतात मस्ती करताना दिसत आहे. यावेळी तो खाली काही दिसलं तर कुतुहूल म्हणून हात लावून पाहतानाही दिसत आहे. वडील मात्र व्हिडीओ शूट करत करत मागे जात होते. यावेळी शेतात तिथेच एक साप निवातं बसला होता.

वडिलांचं थोडं दुर्लक्ष होताच मुलगा थेट सापाकडे जातो आणि त्याचं शेपूट पकडतो. वडिलांच्या लक्षात येताच ते धाव घेतात. पण सुदैवाने साप चिमुरड्याला कोणतीही इजा न करता तेथून निघून जातो.

सुदैवाने सापाचं तोंड विरुद्ध दिशेला असल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून चिमुरडा वाचला याबद्दल लोक देवाचे आभार मानत आहेत. तर काहीजण मोबाइलमध्ये गुंतणं किती धोकादायक आहे याचं उदाहरण म्हणून हा व्हिडीओ शेअर करत आहेत.