अंनिसचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणातील हल्लेखोरांना पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण निवृत्त पोलीस उपनिरीक्षक मनोहर कदम यांनी दिल्याचा सीबीआयच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. पानसरे हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना कदम याने हत्यारे पुरविली आहेत काय, तसेच पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण हल्लेखोरांना दिले आहे का, याची चौकशी कोल्हापूर पोलीस करणार आहेत. तसेच सातारा येथील सनातनचा साधक विनय पवार याच्या माध्यमातून मनोहर कदम वीरेंद्र तावडे याच्या संपर्कात आल्याचे कोल्हापूर पोलिसांच्या तपासात रविवारी समोर आले आहे.
दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्र तावडे याच्या चौकशीदरम्यान मनोहर कदम याचे डॉ. दाभोलकर हत्येत सहभाग असल्याचे धागेदोरे सीबीआयच्या हाती लागले आहेत. २०१२ ते २०१३ या दरम्यान तावडे आणि मनोहर कदम हे एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांचा २०१२ ते १३ या काळात दूरध्वनीवरून अनेकदा संपर्क झाल्याचे सीबीआय तपासात समोर आले आहे. तसेच दाभोलकर यांच्या हत्येमधील सूत्रधार सारंग अकोलकर हा देखील मनोहर कदम याच्या संपर्कात असल्याचे पुढे आले आहे. अकोलकर याच्या घरातून जप्त केलेल्या हार्ड डिस्क तसेच मोबाईलमध्ये कदम याच्याशी संपर्कात असल्याचे समोर आले आहे.
कदम रडारवर होता
पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटी पथकाने मनोहर कदम याच्यावर नजर ठेवली होती, अशी माहिती समोर आली आहे. पुणे सीबीआय पथकाच्या रडारवर येण्यापूर्वी कदम कोल्हापूर पोलिसांच्या रडारवर होता. मात्र समीर, तावडे तसेच कदम यांची नाळ जुळली नसल्याने कदमची चौकशी केली नसल्याचेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
तावडे – कदम संपर्क
मडगाव बॉम्ब स्फोटातील फरार आरोपी अकोलकर, प्रवीण लिमकर, विनय पवार, रुद्र पाटील यांच्यावर पोलिसांचा दाट संशय होता. कदमने तावडेला शस्त्र पुरवल्याचा संशय असून त्यानेच शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याची माहिती सीबीआयच्या तपासात समोर आली आहे. मडगाव बॉम्बस्फोटातील फरार आरोपी विनय पवार हा उंब्रज येथील आहे तर कदम सातारा येथील कोरेगांव तालुक्यातील राऊतवाडी येथील आहे. कदम व पवार हे पूर्वीपासून संपर्कात होते. पवारनेच कदमची तावडेशी ओळख करून दिल्याचे समोर आले आहे.