संसदेचे अधिवेशन ऐन भरात असताना केवळ पुत्रप्रेमासाठी संसदीय कामकाज राज्यमंत्री व भाजपचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नक्वी यांनी येथे गुरुवारी तासाभराची भेट दिली. नक्वी यांचे पुत्र हर्षद हे रिलायन्स पॉलिमर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आहेत. या कंपनीच्या पुढाकाराने चिंचवड-पुणे येथे पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय टेक्नो पॉलिमर प्रदर्शन चर्चासत्राचे आयोजन केले आहे. त्याच्या प्रचारासाठी येथे आयोजित केलेल्या उद्योजकांच्या बठकीत मंत्री नक्वी यांनी भेट देऊन उणेपुरे पाच मिनिटे भाषण केले.
चिंचवड येथे १४ ते १७ एप्रिल या कालावधीत हे प्रदर्शन होत आहे. प्रदर्शनाला देशभरातील प्लॅस्टिक क्षेत्रातील उद्योजक व्यापारी यांनी हजेरी लावावी यासाठी प्रचार मोहीम राबवली जात आहे. येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुरुवारी अशीच एक उद्योजक, व्यापारी यांची प्रचार बठक पार पडली. याकरिता संसदीय कामकाजमंत्री नक्वी यांना निमंत्रित केले होते.
भाजप नेते, केंद्रीय मंत्री शहरात येणार असले तरी त्याची पुरेशी कल्पना भाजपच्या स्थानिक नेत्यांना नव्हती. पक्ष कार्यालयात याबाबत विचारणा केली तेव्हा कार्यकत्रे दिङ्मूढ झाले. विमानतळावरही शहराध्यक्ष संदीप देसाई यांच्यासह मोजकेच कार्यकत्रे होते. स्वागताच्या भव्य कमानी, फलक याचाही अभाव होता.
केंद्रीय मंत्र्यांनी छोटेखानी कार्यक्रमास उपस्थिती लावण्याचे गमक कार्यक्रमस्थळी गेल्यावर उलगडले. हर्षद हे रिलायन्स पॉलिमर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांच्या आग्रहामुळे मंत्र्यांनी या बठकीस हजेरी लावली. मोजक्या शब्दांत मनोगत व्यक्त करताना नक्वी म्हणाले, प्लॅस्टिक क्षेत्रातील तांत्रिक प्रगतीमुळे प्रदूषणाची तीव्रता कमी झाली असून, त्याचा वापरही झपाटय़ाने वाढत आहे. या क्षेत्रात तरुणांनी नोकरी, व्यवसायात करीअर करावे. मेक इन इंडिया, स्वच्छ भारत यासारख्या उपक्रमांना प्लॅस्टिक उद्योग पूरक ठरेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. राज्य चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी कोल्हापुरात विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली असता मंचावर बसलेल्या नक्वी यांनी मान हलवून सकारात्मक प्रतिसाद नोंदवला.