कुरुंदवाडनजीक स्विफ्ट कार पलटी होऊन झालेल्या अपघातात इचलकरंजी नगरपालिकेच्या जलअभियंत्यासह तिघेजण जखमी झाले. जलअभियंता ए. एन. जकिनकर, अभियंता बाळासाहेब बोरे, क्लार्क सादीक गजबर अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला. यामध्ये कारचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
सध्या इचलकरंजीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून पालिका प्रशासन विविध योजनांद्वारे ही टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याच कामासंदर्भात जलअभियंता ए. एन. जकिनकर, बाळासाहेब बोरे व सादीक गजबर हे तिघेजण मारुती स्विफ्ट (क्र. एमएच०९ एम २५८३) मधून अब्दुललाटमाग्रे कुरुंदवाडकडे निघाले होते. कुरुंदवाडनजीक रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू असल्याने खडी पसरण्यात आलेली आहे. रात्रीच्या सुमारास खडीचा अंदाज न आल्याने खडीवरून गाडी घसरून रस्त्याकडेला असलेल्या वीट भट्टीच्या आवारात गाडी चार पलटी खात जाऊन पडली. यामध्ये जकिनकर यांच्या डाव्या पायाला आणि उजव्या हाताला दुखापत झाली असून बोरे यांच्या हाताला व पाठीला मार बसला आहे. तर गजबर यांच्या पाठीला दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना इचलकरंजीतील देशमुख हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तर जकिनकर यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले आहे.