इस्पितळात डॉक्टरअभावी करोना व्यतिरिक्त इतर आजार, व्याधींच्या रुग्णांची फरपट होत असल्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘डॉक्टरांनो, तुम्हाला हात जोडतो.. बारुग्ण आणि इतर सेवा सुरू ठेवा’ असे भावनिक आवाहन केले आहे. तर, वारंवार आवाहन करूनही रुग्ण सेवेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने डॉक्टरांविरोधात मंगळवारी कारवाईचे पहिले पाऊल उचलण्यात आले.

अनेक डॉक्टरांनी रुग्णसेवेपासून फारकत घेतली असल्याने गेल्या महिन्यात आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांनी अशा डॉक्टर विरोधात कारवाईचा इशारा दिला होता. मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही. त्यावर आता मंत्री मुश्रीफ यांनी डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा सुरू करण्यासाठी विनवणी केली आहे.

मुश्रीफ यांनी सांगितले की, जिल्ह्य़ामधील अनेक खासगी दवाखाने, मल्टिस्पेशालिटी दवाखाने यांनी करोना विषाणूच्या भीतीपोटी बा रुग्ण सेवा व इतर सेवा बंद केल्या आहेत. कर्मचारी कामावर येत नाहीत, अशी सबब सांगितली जाते. डॉक्टरांची ही कृती योग्य नाही. करोना सोडून अनेक आजार, व्याधी असलेल्या रुग्णांनी उपचारासाठी कुठे जायचे? जनतेच्या तक्रारी मन सुन्न करणाऱ्या आहेत. अशा संकट काळातच देवाने रुग्ण सेवा करण्याची संधी दिली आहे. ती सेवा डॉक्टरांनी द्यावी, एवढी कळकळीची विनंती आहे.

कारवाई सुरू

खासगी दवाखाने बंदच असल्याच्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत इचलकरंजी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी शहरातील खासगी दवाखान्यांना भेट देऊन पाहणी केली. त्यामध्ये एक दवाखाना बंद असल्याचे तर एका दवाखान्यात करोना संदर्भात गांभीर्यासह सामाजिक अंतर पाळले जात नसल्याचे आढळून आले. या दोघा डॉक्टरांना नोटीस पाठवली जाणार आहे.