कोल्हापूर : इचलकरंजी नगरपरिषदेचा पाणीपुरवठा सभापती, ताराराणी आघाडीचा नगरसेवक संजय तेलनाडे आणि त्याचा भाऊ, नगरसेवक सुनील तेलनाडे यांच्या ‘एसटी’ गँग या टोळीविरोधात सोमवारी मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मोक्काअंतर्गत कारवाई केलेल्यांमध्ये तेलनाडे भावांशिवाय १८ जणांचा समावेश आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, संजय तेलनाडे हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख मटका बुकी आहे. ‘एस.टी.’ गुन्हेगारी टोळीचा तो म्होरक्याही आहे. मटका, हाणामारी, दहशत पसरवणे, खंडणी उकळणे असे गंभीर गुन्हे या टोळीविरोधात दाखल आहेत. यापूर्वी , मटका बुकी सलीम हिप्परगी आणि भरत त्यागी यांच्या खून प्रकरणात तो आरोपी होता. एसटी गँगच्या माध्यमातून त्याने दहशत निर्माण केली होती.

या टोळीविरोधातील ‘मोक्का’ कारवाईच्या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजुरी दिली. त्यानंतर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तेलनाडे बंधूंसह अन्य आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई केली. या कारवाईने इचलकरंजी परिसरात खळबळ उडाली आहे. जमिनी, स्थावर मालमत्ता, आलिशान गाडय़ा, आदी कोटय़वधींची माया त्याने अवैध व्यवसायांतून मिळविल्याची इचलकरंजीमध्ये चर्चा आहे. याबाबतचा प्रस्ताव गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी पाठवला होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उप अधीक्षक गणेश बिरादार करीत आहेत.

इचलकरंजीतील शहापूर पोलीस ठाण्यात संजय तेलनाडे, भाऊ सुनील तेलनाडे, हृषिकेश लोंढे, अरविंद मस्के, राकेश कुंभार, दीपक कोरे, इम्रान कलावंत, राहुल चव्हाण, अरिफ कलावंत, अभिजित जामदार, संदेश कापसे, दिगंबर शिंदे तसेच वकील पवनकुमार उपाध्ये,यांच्यासह साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. तेलनाडे आणि टोळीची दहशत वाढत होती. त्याच्या विरोधातील तRारी वाढल्या होत्या. त्याला रोखण्यासाठी त्याच्यासह १८ साथीदारांच्या विरोधात संघटित गुन्हेगारी मोका  कारवाई करण्यात आली आहे.