कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात ज्या भागात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे अशा भागांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती शोधण्यावर जास्तीत जास्त भर देऊ न वेळीच उपाययोजना करण्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला.

करोना संसर्ग वाढत असल्याने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे आदी उपस्थित होते.

थेट मुख्य सचिवांशी संपर्क कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दररोज वीस केएल ऑक्सिजनचा पुरवठा करण्याबाबत पालकमंत्री पाटील यांनी थेट मुख्य सचिव कार्यालयात संपर्क साधून ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत मागणी केली. मुरबाड येथील ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांशी जिल्हाधिकारी देसाई  यांनीही संपर्क साधला. टँकरच्या उपलब्धतेबाबत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.