दयानंद लिपारे

कोल्हापूर : गोकुळ मधील सत्तांतरानंतर नूतन संचालकांच्या पहिल्या बैठकीत आठवणींचा पट उलगडला गेला. गोकुळची स्थापना, प्रगती, मैत्रीचे स्नेहबंध, सुखद झलक आणि जबाबदारीचे भान याचे दर्शन या निमित्ताने झाले. संचालकांच्या मनोगतातून गोकुळच्या अंतरंगाचे भावविश्व उलगडत गेले.

गोकुळमधील सत्ताबदल विलक्षण ठरला आहे. त्याचा कृतिशील परिचय अध्यक्ष निवडीतून आज सभागृहात दिसला. राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे नूतन अध्यक्ष विश्वास पाटील हे सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्य ७२ वर्षांंचे. तर ३५ वर्षांचे नावेद मुश्रीफ सर्वात तरुण. तरुण संचालक अधिक असले तरी ते उच्च शिक्षित, विधिमंडळाचे कामकाज केलेले असल्याने सभागृहाचे वजनही वाढल्याचे दिसले.

राजकारणापल्याडची मैत्री

मी अध्यक्ष असताना तिसऱ्या क्रमांकाच्या खुर्चीवर रवींद्र आपटे बसत होते.

आम्हा दोघांची गोकुळ मधील चार दशकांची मैत्री. ते अध्यक्ष झाले आणि मी त्यांच्या तिसऱ्या क्रमांकाच्या खुर्चीवर गेलो. तेव्हाच त्यांना मी पुन्हा पहिल्या खुर्चीत येईन असे सांगितले होते; त्याचा जरूर आनंद आहे. पण या राजकीय संघर्षांतून आपटेसारखा मित्र राजकारणात गमावला, अशी सल पाटील व्यक्त केली.

तिसरे सत्तानाटय़ 

अध्यक्षपदाची सूत्रे घेताना विश्वास पाटील यांनी गोकुळमधील तिसऱ्या सत्तानाटय़ाचा रोचक प्रवास कथन केला. १२ मार्च १९९० रोजी तत्कालीन अध्यक्ष आनंदराव पाटील चुयेकर व अरुण नरके यांच्या अध्यक्षपदाची लढत झाली. समान मते मिळाल्याने चिट्ठीतून नरके अध्यक्ष निवडले गेले. २८ मार्च २०१८ रोजी संचालकांची सभा संघर्षमय स्थितीत झाली. काही सदस्य सभागृहात तर काही बाहेर राहिलेले. ताणलेल्या स्थितीत माझी अध्यक्षपदी निवड नाटय़मय पद्धतीने झाली.

गुरेच राखली

‘सभागृहात सर्वात कमी शिकलेला मी. अल्पशिक्षित असल्याने वडील मला पुढे ढोरे राखशील,असे हिणवायचे. पण, गोकुळच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष गाय, म्हैस यांची सेवा करीत गुरेच राखली,’ असा उल्लेख विश्वास पाटील यांनी केल्यानंतर हंशा पिकला. आभार मानताना अरुण डोंगळे हे पुढील अध्यक्ष असल्याचा उल्लेख केला.

असाही पायगुण

गोकुळमध्ये सत्ताबदल घडून आल्यानंतर सुखावह घटना घडली. अक्षय तृतीया, रमजान ईद निमित्ताने आज गोकुळची १६ लाख लिटर इतकी उच्चांकी विक्री झाली. गतवर्षी याच दिवशी १३ लाख ७० हजार लिटर तर यंदा त्यामध्ये सव्वादोन लाख लिटरहून अधिक उच्चांकी विक्री झाली आहे. हा नव्या संचालकांचा चांगला पायगुण असल्याचा उल्लेख केल्यावर टाळ्यांचा गजर झाला.