विटय़ात काँग्रेसचे नेते माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या कार्यालयाची गुरुवारी मोडतोड व कार्यकर्त्यांच्या हाणामारीनंतर शनिवारी पुकारण्यात आलेला बंद शांततेत पार पडला. समाजमाध्यमातून टाकण्यात आलेल्या संदेशावरून आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी गटात राडा झाला. याप्रकरणी कार्यालय मोडतोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
समाजमाध्यमावर गुरुवारी दुपारी एक संदेश टाकण्यात आला. या संदेशावरून काँग्रेसचे श्री. पाटील व शिवसेनेचे आमदार बाबर यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला. या वादातून दोन गटांत मारामारीही झाली. यामध्ये तुषार सपकाळ हा कार्यकर्ता जखमी झाला. सायंकाळी काही कार्यकर्त्यांनी यशवंतनगर येथील श्री. पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयावर चाल केली. यावेळी कार्यालयाची मोठय़ा प्रमाणात नासधूस करण्यात आली.
या प्रकारानंतर दोन्ही जमाव पोलीस ठाण्याच्या आवारात जमले. पाटील यांनीही पोलीस ठाण्यात येऊन दोषींवर कडक कारवाईची मागणी करीत ठिय्या मारला. सायंकाळी उपअधीक्षक कृष्णात िपगळे यांनी विटा पोलीस ठाण्यास भेट देऊन दोषींवर कारवाईचे आश्वासन देताच तणाव निवळला. तोपर्यंत पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे यशस्वी प्रयत्न केले. पोलिसांनी रात्री उशिरा विठ्ठल िभगारदेवे व महेश िभगारदेवे या दोघांना ताब्यात घेतले.
दरम्यान, या प्रकाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज विटा बंद पुकारला होता. या बंदला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. गुढी पाडवा असतानाही विटा बाजार आज बंद राहिला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
दरम्यान, कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून कालच्या दोघांसह आठ जणांना रविवारी अटक करण्यात आली असल्याचे उपअधीक्षक िपगळे यांनी सांगितले. शहरात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आल्याचेही त्यांनी सांगितले.